
सामना ऑनलाईन । लखनौ
उत्तर प्रदेशच्या हरदोई क्षेत्रातून भाजपच्या तिकिटावर खासदार म्हणून निवडून आलेले अंशुल वर्मा यांनी राजीनामा दिला आहे. बुधवारी खासदार अंशुल वर्मा यांनी स्वपक्षावर टिकास्त्र सोडत आपला राजीनामा प्रदेशाध्यक्षाकडे सोपवण्याऐवजी प्रदेश पार्टी कार्यालयाच्या चौकीदाराकडे सोपवला. हरदोई मतदार संघातून अंशुल वर्मा यांचे तिकीट कापून जय प्रकाश रावत यांना उमेदवारी देण्यात आल्याने ते नाराज होते. अखेर त्यांनी बंड करत राजीनामा दिला आणि समाजवादी पक्षामध्ये प्रवेश केला.
लोकसभा निवडणुकीसाठी हरदोई मतदार संघातून विद्यमान खासदार अंशुल वर्मा यांचे तिकीट कापण्यात आले. त्यांच्या ऐवजी जय प्रकाश रावत यांना उमेदवारी देण्यात आली. यामुळे नाराज झालेल्या वर्मा यांनी भाजपवर दलित विरोधी असल्याचा आरोप करत राजीनामा दिला आणि अवघ्या काही तासांमध्ये अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या उपस्थितीमध्ये सपामध्ये प्रवेश केला. यासह अंशुल वर्मा यांचे 21 वर्षापासून भाजपासोबतचे संबंध संपुष्टात आले.
Anshul Verma, BJP’s sitting MP from Hardoi, joins Samajwadi Party (SP) in presence of party president Akhilesh Yadav pic.twitter.com/o97klVRn1G
— ANI UP (@ANINewsUP) March 27, 2019
राजीनामा देताना अंशुल वर्मा म्हणाले की, भाजपने 6 पैकी 4 दलित खासदारांचे तिकीट कापले आहे. पाच वर्षांमध्ये चांगले काम केल्यानंतरही तिकीट कापण्यात आले हा कोणता न्याय आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
हरदोई लोकसभा मतदारसंघ अनुसुचित जातीसाठी आरक्षित आहे. 2014 मध्ये येथे भाजपचे उमेदवार अंशुल वर्मा विजयी झाले होते. यावेळी देखील त्यांना तिकीट दिले जाईल अशी शक्यता होती, परंतु स्वगृही परतलेल्या जय प्रकाश रावत यांना भाजपने तिकीट दिले. जय प्रकाश रावत हे 1991 आणि 1996 असे सलग दोनदा येथून भाजपच्या तिकीटावर निवडून आले होते. परंतु 1998 ला पराभूत झाल्यानंतर त्यांनी भाजपला रामराम केला होता. त्यानंतर सपामध्ये गेलेल्या रावत यांना 2014मध्ये मोदी लाटेमुळे पराभूत व्हावे लागले होते. आता त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने हरदोईची जागा प्रतिष्ठेची झाली आहे.




























































