
भामा आसखेड पाणी पुरवठा योजनेवरून भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये श्रेयवाद सुरू आहे. त्याचे तीव्र पडसाद या प्रकल्पाच्या लोकार्पण सोहळय़ात उमटले. भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यानी महापालिकेत एकमेकांसमोर उभे ठाकत जोरदार घोषणाबाजी केली. भाजपच्या एकाधिकारशाहीला तडाखा देत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी चांगलेच चेपले. त्याचीच आज दिवसभर पुण्यात चर्चा होती.
लोकार्पणाचा कार्यक्रम घेण्यावरून, कोणाच्या हस्ते तो कार्यक्रम करावयाचा यावरून महापालिकेत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होते. अखेर त्यावर तोडगा म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद फडणवीस या नेत्यांना बोलविण्याचे ठरले. त्यानुसार दोन्ही नेते शुक्रवारी आले. पवार-फडणवीस हे उपस्थित राहणार असल्याने हा जाहीर कार्यक्रम करणे योग्य नाही, अशी भूमिका घेत, या कार्यक्रमाचे आयोजन महापालिकेच्या सभागृहात करण्यात आले होते.
कार्यक्रमासाठी पवार हे सभागृहाकडे येत असताना भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी ‘पुण्याची ताकद गिरीश बापट’ अशा घोषणा देण्यास सुरुवात केली. त्याला उत्तर देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ‘दादा- दादा’ ‘एकच वादा अजित दादा’ अशा घोषणा देण्यास सुरुवात केली. त्यानंतर पवार यांनी शांत राहण्याच्या सूचना केल्या. मात्र, हे दोन्हीही नेते सभागृहात स्थानापन्न झाल्यानंतर दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते त्केषाने घोषणा देत एकमेकासमोर आले.
भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यानी ‘एकच चर्चा भाजप युवा मोर्चा’ अशा घोषणा दिल्या. त्यावर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मग ‘एकच वादा अजितदादा’ अशी जोरदार घोषणाबाजी केली. यानंतर काहीवेळ परिसरात गोंधळ उडाला व तणावाचे वातावरण निर्माण झाले. पण पोलिसांनी मध्यस्थी करत हे दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना शांत केले. पुढे तासभर घोषणाबाजी सुरूच होती.
पवार आणि फडणवीस हे कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार असल्याने महापालिकेत मोठय़ा प्रमाणात गर्दी जमली होती. पोलिसांनी कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचण्यापर्यंतचे मार्ग बंद केले असले तरी कार्यकर्त्यांची संख्या मोठी होती.
हे दोन नेते काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असताना कार्यकर्त्यांनीच घोषणाबाजी करत सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधले. त्यामुळे या दोघांच्या भाषणांऐवजी कार्यकर्त्यांच्या घोषणांमुळे हा कार्यक्रम चर्चेत आला.
काँग्रेसचा बहिष्कार
पक्षाच्या नेत्यांना योग्य मान न दिल्यामुळे काँग्रेसने या कार्यक्रमाकरच बहिष्कार टाकला. पक्षाचा एकही नेता या कार्यक्रमाला उपस्थित राहिला नाही. असे काँग्रेसचे गटनेते आबा बागुल यांनी सांगितले.
भाजपच्या अंतर्गत गटबाजीतून घोषणाबाजीचा आरोप
खासदार गिरीश बापट हे कार्यक्रमाला उपस्थित नव्हते. विरोधी पक्षनेते फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंदकात पाटील यांच्या नावाने कोणीही कार्यकर्ते घोषणा देत नव्हते. त्यामुळे कार्यकर्ते बापट यांच्या नावाने घोषणा देत असल्याने सुरुवतीला भाजपमधील अंतर्गत संघर्षातून घोषणाबाजी होत असल्याचे चित्र निर्माण झाले होते.
परंतु भामा आसखेड पाणी प्रकल्पाचे काम देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या काळात झाले असताना आता काही जण श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळेच आम्ही विरोध करत आहोत, असे भाजप कार्यकर्त्यांचे म्हणणे होते. तर फडणवीस, चंद्रकांत पाटील या कार्यक्रमासाठी उपस्थित असतानाही बापट यांची कार्यक्रमाला असलेली अनुपस्थिती आणि त्यात कार्यकर्त्यांकडून होणारी त्यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी ही अंतर्गत गटबाजीतून होत असल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केला. खासदार गिरीश बापट यांच्या अनुपस्थितीबाबत विचारणा केली असता, त्यांची तब्येत ठीक नसल्यामुळे ते कार्यक्रमाला आले नाही, असे सांगण्यात आले.






























































