
छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या निवडणुकीत रामदास आठवले यांचा रिपाइं पक्ष भाजपवर कमालीचा नाराज झाला आहे. भाजपने आमची फसवणूक केली आहे, असा गंभीर आरोप करत चक्क भाजपच्या कार्यालयात जाऊन एका कार्यकर्त्याने अंगावर पेट्रोल ओतून स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. पण तिथे उपस्थित असलेल्या पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप केल्यामुळे पुढील अनर्थ टळला.
महापालिका निवडणुकीत उमेदवारी भरण्याच्या अखेरच्या दिवशी शिंदे गटाने भाजपसोबतची युती तोडत असल्याचे सांगून निवडणुकीला स्वबळावर सामोरे जाण्याची घोषणा केली. यामुळे महायुतीतील रिपाइं (आ.) सारख्या घटकपक्षांची गोची झाली आहे. या पक्षांना महायुतीच्या जागावाटपात काही जागा मिळण्याची शक्यता होती. पण युती तुटल्यामुळे त्यांचा अपेक्षाभंग झाला आहे. या पार्श्वभूमीवर रिपाइंच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या कार्यालयात जाऊन गोंधळ घातला. रिपाइंचे नेते राकेश पंडित व संजय ठोकळ यांनी आज आपल्या समर्थकांसह भाजप कार्यालयात प्रवेश केला. तिथे त्यांनी मंत्री अतुल सावे व खासदार डॉक्टर भागवत कराड यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. भाजपने आम्हाला मित्रपक्ष म्हणून फक्त वापरून घेतले आणि उमेदवारीच्या वेळी वाटाण्याच्या अक्षता दिल्या, असा आरोप या नेत्यांनी केला. या घटनेनंतर रिपाइंच्या कार्यकर्त्यांनी भाजप कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारापुढेच ठिय्या आंदोलन केले. या वेळी त्यांनी भाजपवर आपली जाणीवपूर्वक हेटाळणी केल्याचा आरोप केला.




























































