
भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी नुकत्याच केलेल्या विधानामुळे त्या चर्चेत आल्या आहेत. तसेच त्यांच्या या विधानावरून अनेक तर्कवितर्क करण्यात येत आहेत. भाजपमध्ये त्यांना डावलले जात असून त्या नाराज असल्याच्या चर्चा आहेत. पंकजा मुंडे भाजपामध्ये अस्वस्थ असून त्या लवकरच भाजपाला सोडचिठ्ठी देतील आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे.
सोलापूरच्या दौऱ्यावर असताना सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी महागाई आणि पीएफआयवरील बंदीवरून केंद्र सरकारवर टीका केली. यावेळी त्यांना पंकजा मुंडेंच्या भाजपा सोडण्यावर आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवेशाबाबत विचारले असता त्या म्हणाल्या, प्रत्येकाने आपला निर्णय घ्यावा. जर कोणी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये येणार असेल, तर त्यांचे स्वागतच आहे, अशी महत्त्वाची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
केंद्र सरकारने पीएफआयवर लावलेल्या बंदी नंतर अनेकांकडून राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर अशी मागणी होत आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. जर राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर अशा बंदीची कोणी मागणी असेल तर या मागणीवर चर्चा व्हायला हवी. कुठलीही गोष्ट करताना समाजात त्याची चर्चा झाली पाहिजे. देशात ज्या काही गोष्टी होतील, त्या संविधानाच्या चौकटीत राहून केल्या पाहिजे. सर्वांना समान न्याय दिला पाहिजे, अशी प्रतिक्रिया सुळे यांनी दिली.



























































