
अजित पवार यांच्या बळावर रात्रीच्या अंधारात गुपचूप सत्तास्थापनेचा गेम केला खरा, पण पवारांसोबत आलेले बहुतांश आमदार पुन्हा राष्ट्रवादीत परतल्याने भाजप अस्वस्थ झाला आहे. सत्तेसाठी फोडाफोडी करणार नाही, अशा बाता मारणाऱ्या भाजपने आता ‘ऑपरेशन लोटस’च्या नावाखाली फोडाफोडीचे प्रयत्न सुरू केल्याचे उघड झाले आहे.
काँग्रेसचे आमदार सध्या जे.डब्ल्यू. मॅरिएटमध्ये आहेत आणि राष्ट्रवादीचे आमदार पवईच्या रेनीसन्स हॉटेलात मुक्कामाला होते. मॅरिएटमधील काँग्रेस आमदारांवर अशोक चव्हाण आणि सुशीलकुमार शिंदे यांचे बारीक लक्ष आहे. मात्र या आमदारांना आता भाजपकडून फोनवर ऑफर येत असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. एवढेच नव्हे तर आमच्या आमदारांशी सहज संपर्क व्हावा म्हणून काही भाजपवाल्यांनी या हॉटेलमधील काही खोल्याच आरक्षित केल्या आहेत आणि ते तेथे मुक्कामालाच आले आहेत, असेही चव्हाण म्हणाले.
पोलीस रंगेहाथ सापडले
रेनीसन्स हॉटेलमधील राष्ट्रवादी आमदारांशी भाजपचा संपर्क होऊ नये यासाठी सर्वतोपरी काळजी घेण्यात येत आहे. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड हे सर्व व्यवस्थेवर जातीने लक्ष ठेवून आहेत. आज संध्याकाळी त्यांनी संशयावरून तिघांना हटकले असता ते साध्या कपडय़ातील पोलीस निघाले. त्यातील एक पीएसआय दर्जाचा अधिकारी होता. हॉटेलात कशासाठी आलात, अशी विचारणा केली असता त्यांची भंबेरी उडाली. हा व्हिडीओ आज वृत्तवाहिन्यावरून प्रसारित होताच भाजपने ‘ऑपरेशन लोटस’मध्ये पोलिसांनाही कामाला लावल्याची चर्चा होऊ लागली आहे. दरम्यान, सायंकाळी उशिरा राष्ट्रवादीच्या आमदारांना रेनिसन्स हॉटेलमधून ग्रॅण्ड हयात हॉटेलमध्ये हलविण्यात आल्याचे सांगण्यात आले.

























































