लायकी नसलेल्यांना भाजपने मोठे केले! प्रताप चिखलीकर पक्षातील गद्दारांवर बरसले

‘ज्यांची लायकी नाही, त्यांना भाजपने मोठे केले आणि त्यांनीच पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसला. ही बेइमानी मी कधीच विसरणार नाही, पलटवार जरूर करणार!’ असा इशारा भाजपचे पराभूत उमेदवार प्रताप पाटील-चिखलीकर यांनी दिला. दुसरीकडे चिखलीकरांनी बोलावलेल्या धन्यवाद सभेवर चव्हाण समर्थकांनी बहिष्कार घातला.

नांदेडमध्ये प्रताप पाटील-चिखलीकर यांच्या पराभवाने भाजपचे नाकच कापले गेले. या पराभवावरून सध्या भाजपमधील निष्ठावंत आणि भाजपमध्ये आलेले उपरे यांच्यात जोरदार खडाजंगी सुरू आहे. काल नांदेड येथे झालेल्या भाजप पदाधिकाऱयांच्या बैठकीत अशोक चव्हाणांवर पराभवाचे खापर फोडण्यात आले. आज बिलोलीत घेतलेल्या धन्यवाद सभेतही प्रताप पाटील-चिखलीकर यांनी उपऱया कार्यकर्त्यांमुळे आपला पराभव झाल्याचे मान्य केले. भाजपच्या निष्ठावंतांनी आपल्यासाठी जिवाचे रान केले, परंतु ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपात आलेल्या उपऱयांनी पराभवाला हातभार लावला, असा आरोप त्यांनी केला. बेइमानांना धडा शिकवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असेही चिखलीकर म्हणाले.

प्रताप चिखलीकर यांनी बोलावलेल्या धन्यवाद सभेकडे खासदार अशोक चव्हाण, खासदार डॉ. अजित गोपछडे, माजी खासदार भास्कर पाटील-खतगावकर, माजी आमदार सुभाष साबणे यांच्यासह जिल्हय़ातील भाजपच्या महत्त्वाच्या पदाधिकाऱयांनी पाठ फिरवली.