
महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागात गेल्या सात ते आठ वर्षांपासून एकाच भागात ठाण मांडून बसलेल्या आरोग्य निरीक्षकांच्या बदल्या केल्यानंतरदेखील राजकीय दबावापोटी हे आदेश लागू केले नाहीत. काही भाजपच्या माजी नगरसेवकांचा दबाव असल्याने अतिरिक्त आयुक्तांच्या सहीनंतरदेखील आदेश रखडले असल्याची पालिकेत जोरदार चर्चा होती.
देशात स्वच्छतेत पुणे शहराचा पहिला क्रमांक मिळवण्याच्या दृष्टीने महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी पुण्यात आल्यापासून शहर स्वच्छतेवर भर दिला आहे. प्रत्यक्ष पाहणी करून कर्मचाऱ्यांच्या कामाच्या पद्धतीत बदल करत आहेत. शहराच्या स्वच्छतेसाठी महापालिकेकडे जवळपास २०० आरोग्य निरीक्षक तसेच वरिष्ठ आरोग्य निरीक्षक आहेत. या निरीक्षकांकडे क्षेत्रीय कार्यालयाने नेमून दिलेल्या हद्दीच्या सार्वजनिक स्वच्छतेची जबाबदारी आहे. महापालिका आणि कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांकडून काम करून घेणे, हॉटेल व्यावसायिक आस्थापना, कर्मचारी हजेरी, राडारोडा टाकण्यास प्रतिबंध करणे, अशा विविध कामांची जबाबदारी असते. या कर्मचाऱ्यांची प्रत्येक तीन वर्षांनी प्रशासकीय बदली करणे बंधनकारक आहे; परंतु गेल्या अनेक वर्षांपासून या बदल्या झाल्या नाहीत. अनेक आरोग्य निरीक्षकांकडून राजकीय दबावतंत्राचा वापर करून बदली करून देत नाहीत. यापैकी काही निरीक्षकांकडून स्वच्छतेच्या संदर्भात अपेक्षित काम होत नसल्याचे आढळून आले होते.
या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी समुपदेशनाने आरोग्य निरीक्षकांची बदली करण्याचा निर्णय घेतला. महापालिकेतील ५३ आरोग्य निरीक्षक आणि ६ वरिष्ठ निरीक्षकांनी अनेक वर्षांपासून एकाच क्षेत्रावर ताबा मिळवलेला होता. बदली नको म्हणून राजकीय वरदहस्ताचा आधार घेणाऱ्या या निरीक्षकांची यादी तयार केली. त्यानंतर
जुलैमध्ये आरोग्य निरीक्षकांचे समुपदेशन करून तसेच त्यांना पर्याय निवडण्यास दिला. त्यानंतर या बदलीच्या आदेशावर अतिरिक्त आयुक्तांनी सही केली. त्यानंतर हे आदेश लागू करून तत्काळ बदली केली जाईल, असे या आरोग्य निरीक्षकांना वाटत होते. मात्र, बदली न होण्यासाठी तसेच आपले आर्थिक नुकसान होऊ नये, यासाठी राजकीय नेतेमंडळी पुढे आल्याची चर्चा पालिकेत आहे. बदलीच्या आदेशावर सही झाल्यानंतर हा आदेश लागू होणार नाही, याची काळजी या भाजपच्या नेत्याकडून घेतली जात आहे. याच नेत्याने संबंधित विभागातील अधिकाऱ्यांवर दबाव आणला आहे. त्यामुळे हा आदेश थांबला असल्याची आरोग्य निरीक्षकांत चर्चा होती.