
सामना प्रतिनिधी । पणजी
पणजीत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्याला धमकी देऊन त्याच्या कामात अडथळा आणला ही गंभीर गोष्ट आहे. या घटनेचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो, असे सांगत भाजपचे पणजी मंडळ सचिव विष्णु नाईक यांनी आपली नाराजी व्यक्त करत मतदारांना सावध होण्याचे आवाहन केले.
aकाँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी सरकारी कर्मचाऱ्यासोबत केलेली दादागिरी पाहुन 1990 पूर्वीच्या पणजीची आठवण होते. माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी पणजीतील गुंडगिरी संपवून पणजी सुरक्षित केली होती, याची आठवण करून देत मतदारांनी काँग्रेसला मतदान करताना याचा जरूर विचार करावा, असे नाईक म्हणाले.
पणजी मनपाचे नगरसेवक मिनिन डीक्रूझ व महापौर उदय मडकईकर यांनी आयुक्त शशांक त्रिपाठी यांच्या सोबत स्मार्ट सिटीच्या कामांवरुन वैर ओढवून घेतल्याने सध्या कुठल्याच प्रभागात आयुक्त कामगार देत नाहीत. त्यामुळे मान्सूनपूर्व कामे खोळंबली आहेत. पावसाळ्यात पणजी तुंबली तर त्याला आम्हाला जबाबदार धरले जाऊ नये, असे स्पष्ट केले. डीक्रूझ यांनी महापौरांच्या दादागिरी बद्दल नाराजी व्यक्त करून त्यांच्या मुळे बाकीच्या नगरसेवकांना त्रास सहन करावा लागत असल्याचे यावेळी सांगितले. स्मार्ट सिटी अंतर्गत सुरु असलेली कामे वेळेत पूर्ण करून पावसाळ्यापूर्वी खोदलेल्या रस्त्याची दुरुस्ती योग्य पद्धतीने व्हावी यासाठी भाजपचे नगरसेवक सोमवारी आयुक्तांना भेटून त्यांचे लक्ष वेधणार असल्याचे डीक्रूझ यांनी यावेळी सांगितले.























































