
विधानसभा निवडणुकीदरम्यान शिवसेनेला दिलेला शब्द न पाळणाऱ्या भाजप नेत्यांना त्याची उपरती झाली आहे. राज्याच्या हितासाठी शिवसेनेसोबत एकत्र येऊन सरकार स्थापन करायला आपण आजही तयार असल्याचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत यांनी स्पष्ट केले आहे. एकत्र आलो तरी निवडणुका मात्र वेगवेगळ्या लढू, असे सांगत त्यांनी महाराष्ट्रात बिहारच्या राजकारणाची पुनरावृत्ती होण्याची शक्यता बोलून दाखवली.
राज्याच्या हितासाठी केंद्रीय नेतृत्वाने काही फॉर्म्युला केला आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तो फॉर्म्युला मान्य झाला व केंद्राने आम्हाला या फॉर्म्युल्याचं पालन करण्याचे आदेश दिले तर आम्ही शिवसेनेसोबत जाऊ, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
फडणवीसांनी मात्र पाटलांची हवाच काढली
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मात्र पाटील यांच्या विधानातील हवाच काढली आहे. असा कोणताही प्रस्ताव आम्ही शिवसेनेला दिलेला नाही आणि शिवसेनेकडून आलेला नाही, असे फडणवीस म्हणाले. येत्या काळात स्वबळावर लढायचा निर्णय पक्षाने घेतला आहे, असेही त्यांनी सांगितले. त्यामुळे भाजपमधील विसंवाद यानिमित्ताने उघड झाला आहे.






























































