
विधानसभा निवडणुकीत भाजपने केलेली दगाबाजी समोर येऊ लागली आहे. खेड-आळंदी मतदारसंघातील विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे सुरेश गोरे हे महायुतीचे अधिकृत उमेदवार असताना भाजपनेच खेड तालुकाध्यक्ष अतुल देशमुख यांना निवडणूक लढवायला सांगितली. त्यावेळी त्यांचा उल्लेख भाजपचे अधिकृत बंडखोर उमेदवार म्हणून करायला हवा होता. मात्र तसा उल्लेख न करणे ही चूकच ठरली, असा गौप्यस्फोट भाजपचे पुणे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांनी करून भाजपच्या दगाबाजीची स्पष्ट कबुलीच दिली.
खेड-आळंदी मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार सुरेश गोरे यांच्याविरोधात बंडखोरी करणाऱया जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख यांच्याविषयी भाजपकडे नाराजी व्यक्त केली होती. त्यावेळी शरद बुट्टे यांच्यावरही कडक कारवाई करण्याची मागणी शिवसेनेने केली होती. तक्रारीनंतर भाजपकडूनही त्यांच्यावर कारवाईचे संकेतही दिले होते, मात्र ही कारवाई खोटीच होती हे भेगडे यांनी केलेल्या वक्तव्यावरून स्पष्ट झाले आहे. खेड तालुक्याच्या संघटनात्मक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भेगडे यांनी शनिवारी खेड तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले. अतुल देशमुख म्हणाले, आमदारकीची निवडणूक मी 22 दिवसांत लढवली. मला पक्षानेच निवडणूक लढवायला सांगितली होती. पण हे जसे आता सांगितले जाते तेच निवडणुकीच्या वेळी ठामपणे सांगितले असते तर चित्र वेगळे दिसले असते. याच कार्यक्रमात अतुल देशमुख यांनीही दगाबाजीवर शिक्कामोर्तब केले.


























































