
सामना प्रतिनिधी । भाईंदर
पालिका निवडणुकीत जैन धर्मीयांची मते ढापण्यासाठी मच्छी-मटणाला विरोध करतानाच मुनी आणि मनीच्या जोरावर सत्ता हस्तगत करणाऱ्या भाजपवाल्यांनी भाईंदरमधील जैनांना गंडवल्याचे उघड झाले आहे. सत्ताधारी भाजपने पालिकेच्या माध्यमातून कत्तलखाना उभारण्याचा घाट घातला असून त्यासाठी अर्थसंकल्पात चक्क १०लाखांची तरतूद केली आहे. महापौर डिंपल मेहता यांच्यासह पक्षातील नगरसेवकांनी एकमुखी या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. या दुटप्पी कारभाराचा शिवसेनेने जोरदार भंडाफोड केल्याने भाजप नेत्यांची चांगलीच गोची झाली आहे.
२०१७ मध्ये पार पडलेल्या मीरा-भाईंदर पालिका निवडणुकीत तसेच पर्युषण काळात भाजपचे आमदार नरेंद्र मेहता, तत्कालीन महापौर गीता जैन आणि त्यांच्या सहकारी नगरसेवकांनी शहरात मटण-मच्छी विक्रीला प्रचंड विरोध केला होता. एका जैन मुनींनी मटण-मच्छीला विरोध करणाऱ्या भाजपला मतदान करा, असा व्हिडिओ व्हायरल करून फतवा काढला होता. निवडणुकीत हाच मुद्दा उपस्थित करून भाजपने जैन धर्मीयांची मते मोठय़ा प्रमाणात मिळवली. त्यामुळे भाजप येथे बहुमताने सत्तेत आला. मात्र सत्ता मिळताच भाजपने जैन समाजाला सपशेल गंडवल्याचे समोर आले आहे. पालिकेच्या पहिल्याच अर्थसंकल्पात कत्तलखान्यासाठी १० लाख रुपयांची तरतूद केली.
महापौर डिंपल मेहता व उपमहापौर चंद्रकांत वैती यांनीच याची घोषणा करून आपल्याच निवडणुकीतील जाहीरनाम्याला हरताळ फासला आहे. शिवसेनेचे मीरा-भाईंदर संपर्कप्रमुख, आमदार प्रताप सरनाईक यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजप नेत्यांच्या या दुटप्पी कारभारावर जोरदार टीका केली. कत्तलखाना ही शहराची गरज आहे. मात्र हा कत्तलखाना उत्तन येथे न उभारता घोडबंदर येथील हॉटेल सी. एन. रॉकमागे असलेल्या मोकळ्या जागेवर उभारावा, अशी मागणी केली आहे.
अनुमोदक भाजपचेच दिनेश जैन
आश्चर्य म्हणजे ही तरतूद करताना त्याचे सूचक भाजप गटनेते रोहिदास पाटील तर अनुमोदक चक्क जैन समाजाचेच भाजप नगरसेवक दिनेश जैन आहेत. तत्पूर्वी भाजपने स्थायी समितीत मंजूर केलेल्या अर्थसंकल्पाचे सूचक प्रशांत दळवी आणि अनुमोदक हसमुख गेहलोत यांनी केले असून ते दोघेही भाजपचेच नगरसेवक आहेत. त्याशिवाय कत्तलखाना बांधण्यासाठी भाजपने पालिकेच्या अंदाजपत्रकात एक वेगळा हेड (शीर्ष) ठेवून त्यातसुद्धा २५ हजार रुपयांची रक्कम राखून ठेवली आहे.
































































