वाढीव वीज बिलांवरून भाजपची स्टंटबाजी, राज्यभरात आंदोलन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भाजपच्या काळात वीज बिलांची मोठी थकबाकी होऊन महावितरणला फटका बसला असताना आता भाजपने वीज बिलांच्या मुद्दय़ावरूनच आंदोलनाची स्टंटबाजी सुरू केली आहे.

प्रदेश भाजपकडून आज राज्यव्यापी वीज बिल होळी आंदोलन करण्यात आले. मुंबई, ठाणे, पुणे, संभाजीनगर अशा ठिकठिकाणी झालेल्या  भाजपच्या आंदोलनाच्या स्टंटबाजीने सोशल डिस्टन्सिंगचे मात्र तीनतेरा वाजले.

एकीकडे थकबाकीबाबत गुपचूप असलेल्या भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांना जमा करीत आंदोलन केले. जोपर्यंत सरकार वाढीव वीज बिल सुधारीत करून देत नाही तोपर्यंत भाजप असेच आंदोलन करत राहणार असल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सांगितले. मात्र एकीकडे कोरोनाची दुसरी लाट येत असताना या आंदोलनात पुणाच्या तोंडाला मास्क नाही की सोशल डिस्टन्सिंग नाही असेच चित्र राज्यभरात दिसून आले.

पोलिसांनी ताब्यात घेतले

ठाण्यातही आंदोलनादरम्यान सोशल डिस्टन्सींगचे तीन तेरा वाजले. कार्यकर्त्यांना कोरोनाची लागण झाली तर त्याची जबाबदारी कोण घेणार असा संतप्त सवाल ठाणेकरांनी केला आहे. दरम्यान ही स्टंटबाजी करणाऱया अनेकांना पोलीसांनी ताब्यात घेतले.

भाजपचे खासदार विनय सहस्त्रबुद्धे, किरीट सोमय्या, आमदार, संजय केळकर, निरंजन डावखरे, रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत आंदोलन केले. ठाण्यात वागळे इस्टेट, कोपरीसह एकूण 12 ठिकाणी ही स्टंटबाजी केली. पण या आंदोलनात सर्वसामान्य कार्यकर्त्यांची मात्र चांगलीच फरफट झाली. भाजपने कार्यकर्त्यांची गर्दी जमवून त्यांचेच आरोग्य धोक्यात आणले आहे. आता त्याचे परिणाम कोण भोगणार असा सवाल करण्यात आला आहे.