
पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस हा पक्ष संघटनात्मक बांधणीवर भक्कमपणे टिकून आहे. गेल्या तीन निवडणुकांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी या निवडणुकीत उतरले. या वेळीदेखील अडीच लाख सैन्य त्यांनी पश्चिम बंगालमध्ये उतरवले आहे. ज्याप्रमाणे औरंगजेब महाराष्ट्रात लढण्यासाठी आला, त्याला महाराष्ट्र जिंकता आला नाही; पण त्याची कबर महाराष्ट्रात बांधली गेली. त्याप्रमाणे पश्चिम बंगालबरोबर लढताना भाजपची कबरदेखील तेथेच बांधली जाईल, असा घणाघात शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी केला.
पुण्यात संजय राऊत पत्रकारांशी बोलत होते. ‘‘पश्चिम बंगालमध्ये प्रशासक आणि निवडणूक आयोग सत्ताधारी पक्षाला मदत व्हावी म्हणून दहशतवादाचा अवलंब करत आहे,’’ अशी तोफ संजय राऊत यांनी डागली. ‘‘पश्चिम बंगालसारख्या राज्यात ‘एन्काऊंटर स्पेशलिस्ट’ नेऊन निवडणुका जिंकण्याची गरज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारख्या लोकप्रिय नेत्याला का भासावी? नरेंद्र मोदी हे जगाचे नेते आहेत. उद्या जर अंतराळात राजकारण सुरू झाले तर ते तिथलेही नेते होतील. तरीही त्यांना पश्चिम बंगालमध्ये इतर राज्यांतील टेरर पोलीस फोर्स नेऊन निवडणूक जिंकण्याची वेळ येते, याचा अर्थ त्यांना त्यांचा पराभव दिसत आहे,’’ असे संजय राऊत पुढे म्हणाले.
शिवरायांचे नाव घेण्याची त्यांची लायकी नाही
‘‘कोश्यारी असोत, बागेश्वर बाबा, छिंदम किंवा आताचे आमदार गायकवाड असोत, ही सगळी भाजपची पाळलेली पिलावळ आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल ही लोकं जी विधाने करतात त्याचे समर्थन मुख्यमंत्री करतात. हे अत्यंत दुर्दैवी आहे. शिवाजी महाराज हे राष्ट्रीय ऐक्याचे प्रतीक आहेत. महाराजांचे नाव घेण्याची तुमची लायकी नाही,’’ असा घणाघात त्यांनी केला.
पाण्यासाठी नमो जप करा
ज्या पुणेकरांनी भाजपला 119 नगरसेवक दिले, त्यांना पाण्याचा प्रश्न भेडसावणार नाही. त्यांनी फक्त नमो नमो म्हणावे आणि त्यांच्या नळाला पाणी येईल, असा टोला संजय राऊत यांनी लगावला. पालिकेतील शिवसेना पक्ष कार्यालयाला त्यांनी भेट दिली. तसेच पुणे शहर शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीलाही मार्गदर्शन केले. यावेळी पुणे जिल्हा संपर्कप्रमुख, आमदार सचिन अहिर, पालिकेतील शिवसेनेचे गटनेते नितीन गावडे, राज्य संघटक वसंत मोरे, अतुलराज नागेरे, शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे उपस्थित होते.
सरकार मराठीच्या संवर्धनासाठी गंभीर नाही
देवेंद्र फडणवीस यांनी काही काळापूर्वी एक विधान केले होते की, महाराष्ट्रात फक्त मराठीचीच सक्ती राहील. तेव्हा आम्ही टाळ्या वाजवल्या होत्या. मग आता त्या गर्जनेचे काय झाले? महाराष्ट्राच्या राजधानीत रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी यावे, ही भूमिका अतिरेक कशी असू शकते? मुंबईत मराठी बोलणे हा अतिरेक वाटत असेल तर हे सरकार मराठीच्या संवर्धनासाठी गंभीर नाही. त्यांना मुंबई केंद्रशासित करायची आहे. त्या दिशेने पडलेली ही पावले आहेत, असे संजय राऊत म्हणाले.





























































