…अन् पुणे भाजपने मोदींचे ‘मंदिर’ बंद केलं, अर्धपुतळा असलेली मूर्तीही हटवली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुणे शहरातील औध भागात उभारण्यात आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंदिरावर चौफेर टीकेची झोड उठविण्यात आली होती. पंतप्रधान कार्यालयाने याची दखल घेत याबाबत फोनवरून नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर मंदिर प्लास्टिकच्या आवरणाने झाकून बंद करण्यात आले असून मोदींचा अर्धपुतळा असलेली मूर्ती रात्रीतून हटविण्यात आली.

औंध गावातील अॅड. मधुकर मुसळे यांच्या संकल्पनेतून मयूर मुंडे आणि कार्यकर्त्यांनी नरेंद्र मोदी यांचे मंदिर उभारले होते. 15 ऑगस्टला मंदिर खुले करण्यात आले होते. या मंदिरासाठी 1 लाख 60 हजार रुपये खर्च करून जयपूर येथून मोदी यांचा मार्बलचा पुतळा तयार करून घेतला होता. या मंदिराची माध्यमांतून जोरदार चर्चा झाली. यावर चौफेर टीका देखील झाली. त्यानंतर भाजप नेतृत्वाने याची दखल घेतली. पंतप्रधान कार्यालयानेही नाराजी व्यक्त केली. दिल्लीतून थेट शहर भाजप पदाधिकाऱ्यांची कानउघाडणी करण्यात आली. मंदिर बांधणारे भाजप कार्यकर्ते मयूर मुंडे यांना मंदिर हटविण्याच्या सूचना दिल्यानंतर प्लॅस्टिकच्या आवरणाने झाकून मंदिर बंद करण्यात आले. मोदींचा पुतळादेखील नगरसेविका अॅड. अर्चना मुसळे यांच्या कार्यालयात हलविण्यात आला.

भाजपच्य राष्ट्रीय नेत्याचा फोन आला होता. जिवंत व्यक्तीचे अशाप्रकारे मंदिर बांधून पूजा करणे भाजपच्या विचारसरणीला अनुसरून नाही. त्यामुळे नरेंद्र मोदींबद्दल असणलेल्या भावना रस्त्यावर मंदिर बांधून जाहीररित्या दाखविण्याऐवजी मनात ठेवा असे सांगितले. त्यांतर मोदींचा पुतळा कार्यालयात ठेवला आहे, असे अॅड. मधुकर मुसळे आणि मयूर मुंडे यांनी सांगितले.

अंधभक्तांचा देवच मंदिरातून गायब

आतापर्यंत सर्वच मूलभूत प्रश्नांकडे पाठ फिरवणारा हा अंधभक्तांचा देव, सवयीप्रमाणे या मंदिरातून झोला उचलून निघून गेल्याचे निदर्शनास आले. पुण्यामध्ये भाजपच्या राजवटीमध्ये उबे राहिलेले प्रश्न पाहून या संकटात अडकायला नको, म्हणून हा देव निघून गेला असावा, असे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सांगितले.

राष्ट्रवादीने केले उपरोधिक आंदोलन

पंतप्रधान मोदींचा पुतळा हटविल्याचे समजताच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मंदिराजवळ धाव घेत उपरोधिक आंदोलन केले. मोदी मंदिराच्या जागेवर आरती करण्यात आली. या आंदोलनात शहराध्यक्ष प्रशांत जगताप, नगरसेवक बाहुराव चांदेरे, प्रदेश प्रतिनिधी देशमुख, महेश हंडे, संदीप बालवडकर, किशोर कांबळे, रोहिणी चिमटे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते. पेट्रोल, डिझेलस सिलिंडरचे दर कमी होई दे, यासाठी नवस बोलायला आम्ही येथे आलो. पण, देवच दिसत नसल्याने आम्हाला अगदी भरून आले, असी टोलेबाजी कार्यकर्त्यांनी केली.