‘ईडी’ची धमकी देणाऱया भाजपच्या कार्यकर्त्यांना पैसे वाटताना पकडले! कोल्हापुरात खळबळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीत थेट मतदारांना ‘ईडी’च्या कारवाईची धमकी देणाऱया आणि पुन्हा घराघरात ‘गांधी’ नको म्हणून अपप्रचार करणाऱया भाजप कार्यकर्त्यांकडून मतदारांना पैसेवाटप करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर खळबळ उडाली आहे. मंगळवार पेठ आणि दसरा चौक येथे निवडणूक यंत्रणा आणि पोलीस पथकाने आज छापा मारून भाजप कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडे रोख रकमेसह मतदारांच्या नावांची यादी आढळून आली. ताब्यात घेतलेल्या भाजप कार्यकर्त्यांची रात्री उशिरापर्यंत चौकशी करून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणूक दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोपांमुळे प्रतिष्ठेची बनली आहे. एका शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांकडून मतदारांची माहिती गोळा करण्यात येत असल्याचे सांगत, भाजपचे प्रदेशाध्यक्ष व माजी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मतदारांच्या खात्यावर पैसे जमा झाल्याचे आढळल्यास ‘ईडी’ची कारवाई करण्याची धमकी दिली होती. तसेच विरोधक घराघरात पैसे वाटतील, त्यामुळे घरात ‘गांधीं’ना येऊ देऊ नका, असा अपप्रचारही जाहीर सभांतून करण्यात आला होता. आता मात्र भाजप कार्यकर्त्यांकडूनच मतदारांना आमिष दाखविण्यात येत असल्याचा प्रकार समोर आला आहे. चार दिवसांपूर्वीच मंगळवार पेठ परिसरातील महिलांना धार्मिक कार्यक्रमाच्या नावाखाली बोलावून वस्तूंचे वाटप केल्याचा प्रकार समोर आला होता. संबंधित महिलांनी नाराजी व्यक्त करून त्या भाजप महिला कार्यकर्तीच्या घरावर दिलेल्या वस्तू फेकल्या होत्या.

आता मतदानाच्या पूर्वसंध्येलाच मतदानासाठी पैसे वाटत असल्याच्या कारणावरून आज दुपारी मंगळवार पेठेतील पद्मावती मंदिर परिसरात माजी नगरसेविका सुनंदा मोहिते यांच्या कार्यालयावर निवडणूक विभाग व पोलिसांनी कारवाई केली. यावेळी कार्यालयातून भाजपचे प्रचारपत्रक, पैशांची पाकिटे आणि मतदारांच्या नावांची यादी जप्त करण्यात आली. याप्रकरणी अशोक देसाई, विजय जाधव, संतोष माळी यांना जुना राजवाडा पोलिसांनी ताब्यात घेतले. तर, सायंकाळी दसरा चौक येथील सुतारवाडा परिसरातही भाजपच्या दोन कार्यकर्त्यांना पैसे वाटताना रंगेहाथ पकडण्यात आले. जोतिराम जाधव आणि प्रवीण कणसे अशी पैसे वाटणाऱयांची नावे असून, लक्ष्मीपुरी पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडे 500 रुपयांची नोट असलेली पाकिटे आणि जेवणाचे कूपन आढळल्याची माहिती पोलिसांनी दिली. या दोन्ही घटनांबाबत रात्री उशिरापर्यंत गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

दादा, हे वागणं बरं नव्हं! आता भाजपच्या कार्यकर्त्यांना ‘काय’ लावणार?

एकीकडे मतदारांना ‘ईडी’ची कारवाई करण्याची धमकी देण्यासह ‘गांधी’ स्वीकारू नका म्हणून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जाहीर आवाहन केले होते. मात्र, विरोधकांवर आरोप करणाऱया भाजप कार्यकर्त्यांकडूनच शहरात काही ठिकाणी पैशांचे वाटप करण्यात येत असल्याच्या प्रकाराची नेटकऱयांची दखल घेतली आहे. सोशल मीडियावर ‘दादा, हे वागणं बरं नव्हं!’ यासह ‘तुम्ही मतदारांना ‘ईडी’ लावणार होता, आता तुमच्या कार्यकर्त्यांना काय लावणार?’ असे अनेक उपरोधिक सवाल नेटकऱयांनी उपस्थित केले आहेत.

आज मतदान

 कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उद्या, मंगळवारी मतदान होणार आहे. आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर ही पोटनिवडणूक होत आहे. महाविकास आघाडीने दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांची पत्नी जयश्री जाधव यांना उमेदवारी दिली आहे. तर भाजपने सत्यजित कदम यांना उमेदवारी दिली. 15 उमेदवार रिंगणात आहेत. शनिवार, 16 रोजी मतमोजणी होणार आहे.