
भाजपच्या कार्यकर्त्यांनी आज डोंबिवलीत भररस्त्यात धिंगाणा घातला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सोशल मीडियावर व्हायरल झालेला साडीतील फोटो काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी प्रकाश पगारे ऊर्फ मामा यांनी फेसबुकवर फॉरवर्ड केला होता. त्यानंतर भाजप जिल्हाध्यक्ष नंदू परब यांच्यासह कार्यकर्त्यांनी 70 वर्षीय मामा पगारे यांचे हातपाय पकडून भर रस्त्यात त्यांना साडी नेसवली. आमच्या नेत्याचा अपमान करतो काय, तुमच्या समाजाला जास्त माज आलाय का, बघून घेऊ, अशी धमकी देत कार्यकर्ते निघून गेले.
पंतप्रधानांच्या फोटोविषयीचा नेमका प्रकार मामा पगारे यांनी स्पष्ट केला. ते म्हणाले, मी केवळ मला आलेली पोस्ट फॉरवर्ड केली. मी पंतप्रधानांचा अपमान केला, असे त्यांना वाटले असेल तर त्यांनी माझ्याविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करायला हवा होता अथवा कायदेशीर कारवाई करायची होती. परंतु त्यांनी तसे न करता माझ्यासोबत असभ्य प्रकार केला. मी डोळ्यांच्या उपचारासाठी मानपाडा येथील रुग्णालयात गेलो होतो. त्या वेळी भाजपचा पदाधिकारी संदीप माळी याने फोन करून मला बाहेर बोलावले. बाहेर येताच नंदू परब, संदीप माळी, कर्ण जाधव, दत्ता माळेकर यांच्यासह 10 ते 15 जणांनी अचानक मला घेरले आणि जबरदस्तीने साडी नेसवली. या प्रकारानंतर मामा पगारे यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात धाव घेऊन अॅट्रॉसिटीची तक्रार दिली.
भाजपवाल्यानो बांगडय़ा घाला!
डोंबिवलीत भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या कृत्याचा मी जाहीर निषेध करतो. दररोज भाजपचे कार्यकर्ते काँग्रेससह महाविकास आघाडीच्या नेत्यांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करत असतात. मात्र आम्ही कधी कायदा हाती घेतला नाही. मामा पगारे हे गेल्या 40 वर्षांपासून काँग्रेसचे काम करत आहेत. त्यांच्याशी खोटे बोलून नंतर जोरजबरदस्तीने भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी साडी नेसवली. ज्येष्ठ नागरिकासोबत अशा प्रकारे कृती करणे मर्दुमकी नाही. त्यामुळे भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी बांगडय़ा घालाव्यात, असा संताप काँग्रेसचे कल्याण जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी व्यक्त केला.
































































