भाजपमध्ये आता मोदी–शहांविरोधी सूर, राजतिलक की करो तयारी, अब आयेंगे गडकरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

लोकसभेची सेमीफायनल हरल्यानंतर आता भाजपमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्या ‘हुकूमशाही’ विरोधातील सूर आळवला जाऊ लागला आहे. सोशल मीडियावर तर ‘राजतिलक की करो तयारी, अब आएंगे गडकरी’ अशा पोस्ट व्हायरल झाल्या असून मोदी-शहा यांना दूर सारून नितीन गडकरी यांचा चेहरा जनतेसमोर आणा अशी मागणी होऊ लागली आहे.

गडकरी यांनी यापूर्वी भाजपचे अध्यक्षपद भूषविले आहे. मोदी आणि शहा यांच्या ‘हम करे सो कायदा’ या भूमिकेमुळेच पक्षाला मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये पराभव पत्करावा लागला असे आता बिनधास्त बोलले जाऊ लागले आहे. मोदी पक्षाच्या खासदार आणि मंत्र्यांना बोलू देत नाहीत. गडकरी यांनीही हीच व्यथा मांडली होती असे काही दिवसांपूर्वीच भाजपचे माजी खासदार नाना पटोले यांनी सांगितले होते. पाच राज्यांतील निवडणुकीपर्यंत पक्षात मोदी-शहा यांच्या कार्यपद्धतीबद्दल कुजबूज होती, मात्र आता पराभवानंतर भाजप नेते आणि कार्यकर्ते उघडउघड विरोधी सूर आळवू लागले आहेत. सोशल मीडियावर तर तशा पोस्टही फिरू लागल्या आहेत.