
उत्तर प्रदेशातील भाजप सरकारच्या देखरेखीखाली पोलीस, तहसील आणि बांधकाम कामांमध्ये भ्रष्टाचाराची स्पर्धा सुरू आहे, असा घणाघात समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी भाजपवर केला. नवीन रस्त्याची खराब स्थिती दर्शवणारा व्हिडीओ शेअर करत त्यांनी सरकारवर हल्ला चढवला. भ्रष्ट भाजपचे काम त्यांच्या पक्षासारखेच वरून चमकदार आणि आतून निकृष्ट दर्जाचे आहे. वास्तविक भाजपच्या देखरेखीखाली भ्रष्टाचाराची स्पर्धा सुरू आहे. सरकारची गुप्त उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आणि सरकारला खूश करण्यासाठी कोणत्याही थराला जातील अशा अधिकाऱ्यांची वेगवेगळ्या पदांवर निवड केली जात आहे. भाजप सरकारमध्ये अधिकाऱ्याच्या प्रतिष्ठेला लागलेल्या डागाला एखादे पदक मानले जाते, अशी टीका अखिलेश यांनी ‘एक्स’द्वारे केली.