बीकेसीत प्रदूषण करणाऱ्यांना दंड ठोठावणार, एमएमआरडीए आयुक्तांचा इशारा

265

वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समधील (बीकेसी) हवेतील प्रदूषणात दिवसेंदिवस वाढ होत आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) त्याची गंभीर दखल घेतली आहे. प्रदूषण करणाऱ्यांना दंड ठोठावला जाणार आहे. मेट्रो रेल्वेचे काम सुरू असलेल्या साइटस्वरील सुपरवायझरनी प्रदूषण होऊ नये म्हणून काळजी घेतली नाही तर त्यांना दिवसाला पाच हजार रुपये दंड ठोठावला जाणार आहे.

एमएमआरडीएचे आयुक्त आर. ए. राजीव यांनी संबंधित अधिकाऱ्यांची नुकतीच एक बैठक घेतली होती. प्रदूषण करणाऱ्यांना दंड ठोठावण्याचा निर्णय त्यात घेतला गेला. बीकेसीत मेट्रो स्थानकाचे काम सुरू आहे. त्यामुळे सर्वाधिक प्रदूषण होत असल्याची माहिती आहे. मेट्रो स्थानक आणि कास्टिंग यार्डमध्ये मोठय़ा प्रमाणात होणारी धूळ, चिखल हे वेळीच पाणी मारून धुण्याची जबाबदारी सुपरवायझरची असून त्यात हलगर्जीपणा आढळल्यास ते दंडास पात्र ठरतील असे आयुक्तांनी बजावले आहे.

मुंबई मेट्रो रेल महामंडळाच्या वतीने भुयारी मेट्रोचे काम बीकेसीमध्ये सुरू आहे. त्यामुळेही मोठय़ा प्रमाणात धूळ हवेत पसरते. एमएमआरडीएच्या मुख्यालयाच्या बाजूलाच हे काम सुरू असल्याने मुख्यालयाच्या इमारतीवरही धूळ उडते. आयुक्तांच्या आदेशानुसार रोज संध्याकाळी ती धुऊन काढली जाते. एमएमआरडीएच्या मैदानावर कार्यक्रम आयोजित करणाऱ्या आयोजकांनीही प्रदूषण होऊ नये यासाठी सूचनांचे पालन करण्यास सांगण्यात आले आहे. कार्यक्रमापूर्वी मैदानात पाणी मारावे तसेच कार्यक्रमानंतर होणारा कचरा स्वच्छ करावा असे बजावण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या