
आंध्र प्रदेशच्या दौऱयावर असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हेलिकॉप्टरजवळ काळे फुगे उडविण्यात आले. याप्रकरणी चार काँग्रेस कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान यामुळे पंतप्रधानांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा उपस्थितीत झाला आहे. मात्र, आंध्रप्रदेश पोलिसांनी सुरक्षेत त्रुटी झाली नसल्याचे म्हटले आहे.
पंतप्रधान मोदी यांचे विशेष विमानाने विजयवाडा विमानतळावर सकाळी 8.30 वाजता आगमन झाले. तेथून हेलिकॉप्टरने भीमावरम येथे उड्डाण केले. पंतप्रधानांचे हेलिकॉप्टरने उड्डाण केल्यानंतर काळे फुगे आकाशात उडताना आढळले. पंतप्रधानांच्या दौऱयाला विरोध करण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केले. निषेध करीत काळे फुगे उडविले. विमानतळाबाहेरून हे फुगे उडविण्यात आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. पोलिसांनी चार कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. ‘एएनआय’ वृत्तसंस्थेने याबाबतचा व्हिडिओ पोस्ट केला आहे.

























































