मराठी भाषिकांचा सीमाभागात 1 नोव्हेंबरला ‘काळा दिन’

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा रविवारी (1 नोव्हेंबर) कर्नाटकातील मराठी भाषिकांकडून हरताळ व ‘काळा दिन’ पाळण्यात येणार आहे. नियमांचे पालन करीत गटागटाने प्रार्थना, संवाद व चर्चासत्र आयोजित करीत आपला निषेध नोंदवावा, असे आवाहन मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने मराठी भाषिकांना केले आहे. दरम्यान, गर्दी टाळून मोजक्या कार्यकर्त्यांसह मराठा मंदिराच्या खुल्या जागेत सकाळी 10.30 ते दुपारी 2.00पर्यंत धरणे धरण्यात येणार आहे. यानंतर सीमावासीयांच्या भावना सोशल मीडियातून व्यक्त केल्या जाणार आहेत.

दरवर्षी 1 नोव्हेंबर रोजी कर्नाटक राज्यस्थापनेच्या दिवशी मराठी भाषिक कडकडीत सुतक, हरताळ व काळा दिन पाळतात. या दिवशी मराठी भाषिकांकडून काळी वस्त्रे परिधान करून व झेंडे घेऊन मूक सायकल फेरी काढून महाराष्ट्रात येण्याचा निर्धार व्यक्त केला जातो.

महाराष्ट्रातील मंत्री काळय़ा फिती लावून काम करणार

मराठी भाषकांकडून पाळण्यात येणाऱया ‘काळा दिन’ला पाठिंबा म्हणून या दिवशी महाराष्ट्रातील सर्व मंत्री काळी फीत बांधून कामकाज पाहणार आहेत. नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेतल्याची माहिती शिवसेना नेते व सीमाभाग समन्वयमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. मराठी भाषिकांच्या पाठीशी नेहमीच असून, लढा यशस्वी होईपर्यंत पाठीशी राहण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या