
सामना ऑनलाईन । मुंबई
व्हॉटस्अॅपच्या वाढत्या वापरामुळे मागे पडलेली ब्लॅकबेरीची मेसेंजर सेवा महिनाअखेर बंद होणार आहे. वाढत्या स्पर्धेत ब्लॅकबेरीच्या व्यासपीठावर ग्राहकांना टिकवून ठेवण्यात कंपनीला अपयश आल्याने गेल्या सहा-सात वर्षांपासून सुरू असलेली ही मेसेंजर सेवा बंद करण्याचा निर्णय ब्लॅकबेरीचे सर्वाधिक शेअर्स असलेल्या एम्टेक या कंपनीने घेतला आहे.
व्हॉटस्अॅपच्या आधीपासूनच ब्लॅकबेरी मेसेंजर सेवा जगभरात लोकप्रिय होती. या सेवेची गोपनीयता चांगली असल्याने आणि गैरवापराची सुतराम शक्यता नसल्याने सुरुवातीपासूनच व्यावसायिक व राजकीय क्षेत्रातील लोकांना या सेवेची भुरळ पडली होती. जगभरात सुमारे 19 कोटी एवढे त्यांचे ग्राहक होते.


























































