पाणी पुरवठा विभागात फक्त ठेकेदारांचीच कामे होतात – संतोष थेराडे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तब्बल 9 महिने उलटले तरी संगमेश्वरच्या कुचांबे गावच्या नळपाणी योजनेच्या निविदा तयार होत नसल्यामुळे शिवसेनेचे जि.प.सदस्य संतोष थेराडे यांनी पाणी पुरवठा अधिकाऱ्यांना धारेवर धरत याठिकाणी फक्त ठेकेदारांचीच कामे होतात, सर्वसामान्य माणसाला न्याय मिळत नसल्याचा खळबळजनक आरोप केला. जि.प. पाणी पुरवठा अधिकाऱ्यांना त्यांच्या दालनामध्येच संतोष थेराडे यांनी धडक दिली. थेराडे यांचा आक्रमक पवित्रा पाहून अधिकाऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले.

संतोष थेराडे यांच्या मतदार संघातील कुचांबे गावात राष्ट्रीय पेयजलमधून नळपाणी योजना मंजूर करण्यात आली आहे. डिसेंबर 2018 मध्ये मंजूर झालेल्या योजनेच्या निविदा निघायला तब्बल 9 महिने वाट पहावी लागली. विधानसभा निवडणूकीची आचारसंहिता तोंडावर आली तरी पाणी पुरवठा विभागाने कुचांबे गावच्या नळपाणी योजनेची निविदाच काढली नाही. निविदा का काढली नाही, असा सवाल विचारत जि.प.सदस्य संतोष थेराडे यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. 9 महिने तुम्हाला निविदा काढायला का लागतात, यावर अधिकारी म्हणाले की, दोन दिवसांपूर्वी फाईल माझ्या टेबलवर आली. यामुळे थेराडे अधिकच संतापले आणि याठिकाणी फक्त ठेकेदाराचीच कामे होतात, आम्ही दिलेली किंवा सर्वसामान्य माणसांची कामे होत नाहीत असा आरोप केला. जि.प.सदस्य संतोष थेराडे यांनी पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना कारभारात नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, जलयुक्त शिवार योजनेतील 2 कोटी 40 लाख अखर्चित आहेत. त्यापैकी 1 कोटी रुपये सिध्दीविनायक ट्रस्टने दिले आहेत. डॉ.बाबासाहेब आंबेडकर विंधन विहिर योजनेचे 43 लाख रुपये पडून आहेत. हा एक प्रकारचा अन्यायच आहे. या सर्व प्रकाराला अधिकारीच जबाबदार असल्याचा आरोपही त्यांनी केला.