ईश निंदेच्या आरोपावरून पाकमध्ये हिंदू वस्तीवर हल्ला; मंदिर, शाळांची तोडफोड, जाळपोळ

847

ईश्वरनिंदेच्या आरोपावरून पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील हिंदू वस्तीवर मुस्लिम कट्टरतावाद्यांनी हल्ला करून दंगल पेटवली. घरे, दुकाने, शाळा, मंदिर आणि रुग्णालयांवरही हल्ले करत त्यांची मोठय़ा प्रमाणात तोडफोड केली. याप्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापकाला अटक करण्यात आली आहे.

सिंध प्रांतातल्या घोटकी शहरातील सिंध पब्लिक स्कूलच्या एका अल्पवयीन मुलाने शाळेतून घरी गेल्यानंतर मुख्याध्यापकांनी ईश्वरनिंदा केल्याचे पालकांना सांगितले. मुलाचे वडील अब्दुल अजीज राजपूत यांनी याची माहिती मुस्लिम कट्टरतावादी नेता अब्दुल हक याला दिली. सिंधमधील हिंदू मुलींच्या अपहरण आणि धर्मांतर प्रकरणात याचा हात आहे. त्याने अनेक मशिदींतून ही माहिती लाऊडस्पीकरवरून सांगत लोकांना भडकवले आणि त्यानंतर हिंदूंची घरे, दुकाने, मंदिरे, शाळा आणि रुग्णालयांचीही हल्लेखोरांनी तोडफोड केली.

मुख्याध्यापकाविरोधात गुन्हा, अटक
याप्रकरणी शाळेतील मुलाचे वडील अब्दुल राजपूत यांनी मुख्याध्यापक नोतन दास यांच्याविरोधात ईश्वरनिंदेचा गुन्हा दाखल केला. दास यांना अटक करण्यात आली असून सुरक्षेच्या कारणावरून त्यांची अज्ञातस्थळी रवानगी करण्यात आली आहे.

हिंदूंना संरक्षण द्या!
पाकिस्तानच्या मानवाधिकार आयोगाने या हल्ल्याची दखल घेतली असून शाळा तसेच घरांवर केलेल्या हल्ल्याचा निषेध केला. अशाप्रकारे ईश्वरनिंदेचा ठपका ठेवत कट्टरतावादी हिंदूंवर हल्ले करत आहेत. या भागातील हिंदूंच्या जिवाला धोका असून त्यांना योग्य ते संरक्षण द्यावे, अशी मागणी आयोगाने केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या