
सामना ऑनलाईन, मुंबई
लोकलच्या अपंगांच्या डब्यात अल्पवयीन अंध मुलीच्या असहाय्यतेचा गैरफायदा उचलत तिचा विनयभंग केल्याची घटना आज मंगळवारी घडली. मागे उभा असलेला तरुण आपल्याशी शारीरिक चाळे करतो असे जाणवताच त्या अंध मुलीने आक्रमक रूप धारण केले आणि त्या तरुणाचा हात मागच्या मागे मुरगळून त्याला डब्यातच खाली आडवे केले. मग त्याला रेल्वे पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.
दीक्षा (नाव बदललेले) ही 15 वर्षीय मुलगी अंध आहे. ती दादर येथील अंध मुलांच्या शाळेत शिकते. सोमवारी रात्री शाळा सुटल्यानंतर 56 वर्षीय वडिलांसोबत घरी जाण्यासाठी ती दादर स्थानकात आली. दोघे कल्याणला जाणाऱ्या लोकलच्या अंपगांच्या डब्यात घुसले. दीक्षाला पाहून तिच्या मागोमाग एक तरुणदेखील आत गेला. लोकल सुरू होताच तरुणाने दीक्षाच्या नको तिथे हात लावण्यास सुरुवात केली. हे जाणवताच दीक्षाने त्या व्यक्तीचा हात धरला आणि हाताची बोटे इतकी घट्ट पकडून धरली की त्या वेदनेने कळवळत तो तरुण गुडघ्यावर बसला. त्यानंतर दीक्षाच्या वडिलांनी त्या तरुणाला पकडून दादर रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिले. विशाल बळीराम सिंग (24) असे त्या तरुणाचे नाव असून तो मुलुंड येथील एका खासगी कंपनी संगणक टेक्निशियनचे काम करतो. दरम्यान, कराटेचे धडे घेतलेल्या दीक्षाने त्या तरुणाला अस्मान दाखवले. अशा शब्दांत वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे यांनी दीक्षाचे कौतुक केले.
म्हणूनच त्याला तेथेच आडवा केला!
आमच्यासारखे अंध–अपंग अशा लिंगपिसाटांच्या टार्गेटवर असतो. आमच्या असहाय्यतेचा गैरफायदा उचलण्यासाठी ते सदैव तयारच असतात. म्हणूनच आमच्या शाळेत आम्हाला स्वसुरक्षा व कराटे शिकवले जातात. त्याचा आज मला फायदा झाला. कराटे व स्वसुरक्षा कशी करायची हे चांगले माहीत असल्यामुळे त्या तरुणाला लोकलमध्येच आडवे करू शकली. यापुढे अंध-अपंगांच्या वाटेला जाण्यापूर्वी तो भामटा नक्कीच शंभरवेळा विचार करेल, असे दीक्षाने म्हटले आहे.




























































