अंध टेलिफोन ऑपरेटरला मुख्यमंत्री शाबासकी देतात तेव्हा…

2099

दुपारी साडेबाराची वेळ. सेंट जॉर्ज रुग्णालयात आलेला कॉल नेहमीप्रमाणे राजू चव्हाण यांनी उचलला. टेलिफोन ऑपरेटर म्हणून चव्हाण यांचा नेहमीप्रमाणे हा व्यस्त दिवस होता. त्यात कोरोनामुळे चौकशीसाठी येणाऱ्या दूरध्वनींचे प्रमाणही वाढलेले. पण हा आलेला कॉल होता थेट महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडून. राजू चव्हाण यांचे अभिनंदन करण्यासाठी…

कोविडच्या काळात अनेक कोरोना योद्धे अविरत काम करीत आहेत. त्यातील राजू चव्हाण एक आहेत. नेत्रहीन राजू चव्हाण एक दिवसही रजा न घेता गेल्या दोन महिन्यांपासून रोज कामावर येतात. आणखी एक शारीरिकदृष्ट्य़ा दिव्यांग ऑपरेटर संदीप शिंदेदेखील नियमितपणे मीरा रोड येथून सेंट जॉर्जला पोहचतात आणि कर्तव्य बजावतात. राजू चव्हाण हे दिवसपाळी, तर शिंदे हे रात्रपाळीवर असतात.

यासंदर्भात वृत्तपत्रांतील बातमीची दखल घेऊन स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या कोविड योद्धय़ाशी बोलून त्याचे अभिनंदन करायचे ठरविले. त्याप्रमाणे ते चव्हाण यांच्याशी बोलले. मुख्यमंत्री आपले कौतुक करताहेत म्हटल्यावर आश्चर्याचा धक्का बसलेल्या चव्हाण यांनी त्याही स्थितीत या सगळ्य़ांचे श्रेय आपल्या वरिष्ठांना दिले आणि मी आपला खारीचा वाटा उचलला असे उद्गार काढले. ‘तुम्ही खूप चांगले काम करत आहात, अशा परिस्थितीत जिथे रुग्णालयांत कर्मचाऱ्यांची गरज आहे, तुम्ही दिव्यांग असूनही कुठेही सुट्टी न घेता काम करता हा इतरांसाठी आदर्श आहे. असा सर्वांनी खारीचा वाटा उचलला, तर मोठय़ा लढाया जिंकता येतात’ असे मुख्यमंत्री म्हणाले. ऑपरेटरचे काम करताना केवळ दूरध्वनी जोडून देणे एवढेच काम आम्ही करीत नाही, तर अनेकदा ज्यांचे कॉल येतात ते लोक रुग्णांचे नातेवाईक असतात, घाबरलेले असतात. अशावेळी त्यांना आम्ही धीर देतो, त्यांना मार्गदर्शन करतो, असेही चव्हाण यांनी सांगितले.

कर्तव्य बजावणाऱ्यांचा आदर
कोरोना काळात मदतीला धावून जाणाऱ्या अनेक लोकांनी वेळप्रसंगी कशाचीही पर्वा न करता काम केले आहे, मदत केली आहे. त्यांनी कुठलीही अपेक्षाही व्यक्त केलेली नाही, कसलाही मोबदला त्यांना यासाठी मिळालेला नाही. अशा ज्ञात-अज्ञात लोकांमुळे कोरोनाचा हा लढा आपण जिंकू. विशेषतः मुंबईत विविध ठिकाणी आपत्तींमध्ये लोक माणुसकीने इतरांच्या मदतीला धावतात. ही आपत्ती निराळी आहे. या वैद्यकीय आणीबाणीत आरोग्याला धोका आहे हे माहीत असूनही माणुसकी न सोडता तसेच कर्तव्य बजावणाऱ्या व्यक्तींबाबत आदर वाटतो, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या