
सामाजिक कार्य आणि राष्ट्रवादाचा अनोखा संगम साधत विलेपार्ले (पश्चिम) येथील ‘द्वारकादास जे. संघवी अभियांत्रिकी महाविद्यालया’च्या ‘राष्ट्रीय सेवा योजना’ युनिटतर्फे गुरुवार, 26 फेब्रुवारी रोजी वार्षिक रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. कूपर रुग्णालयाच्या अगदी समोर असलेल्या महाविद्यालयीन परिसरात हे शिबिर पार पडणार आहे.
यंदाच्या रक्तदान मोहिमेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ‘हिंदुस्थानी संरक्षण दल’ ही संकल्पना. सीमेवर देशाचे रक्षण करणार्या सैनिकांचे धैर्य, त्याग आणि सेवावृत्तीचा सन्मान करण्यासाठी ही विशेष संकल्पना निवडण्यात आली आहे. आपल्या जवानांप्रमाणेच सामान्य नागरिकांनीही रक्तदान करून देशसेवेत आपला खारीचा वाटा उचलावा, असा संदेश या माध्यमातून दिला जाणार आहे. विद्यार्थी, शिक्षक आणि नागरिकांनी या मोहिमेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन महाविद्यालयाकडून करण्यात आले आहे.





























































