
सामना ऑनलाईन । मुंबई
मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर तुम्ही जाण्याचा विचारात असाल तर जरा सांभाळून. कारण गेल्या काही दिवसांपासुन किनाऱ्यावर ‘ब्ल्यू बॉटल’ जेलिफिश आढळुन आले आहेत. गिरगाव आणि जुहू समुद्रकिनाऱ्यावर मोठ्या संख्येने हे विषारी ‘ब्ल्यू बॉटल’ जेलीफिश आल्याचे सागरी परिसंस्थेच्या अभ्यासकांच्या निदर्शनास आले आहे. ‘ब्लू बॉटल’ जेलीफिशने एखाद्याला डंख केल्यास त्या ठिकाणी लाल रंगाचे व्रण उठून काही वेळात गाठ येते आणि असह्य़ वेदना होतात.
विशेषत: तीन वेगवेगळ्या प्रकारचे जेलिफिश समुद्र किनाऱ्यावर आढळतात. त्यापैकी पावसाळ्याआधी ब्ल्यु बटन, पावसाळ्यात ब्ल्यु बॅाटल आणि पावसाळ्या नंतर ब्ल्यु बॅाक्स जेलिफिश आढळतात. ब्ल्यु बॅाटल जेलिफिश हे वजनाने हलके असल्यामुळे समुद्राच्या लाटांसोबत ते समुद्र किनाऱ्यावर येत असतात. हे जेलिफिश दिसायला जरी आकर्षक असले तरी, विषारी आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये मुंबईत गणेशविसर्जनावेळी काही गणेश भक्तांना जेलिफिशने दंश केला होता. त्यामुळे समुद्र किनाऱ्यांवर जाणाऱ्या नागरिकांनी उत्साहाच्या भरात समुद्रात उतरू नये किंवा समुद्रकिनाऱ्यावर अनवाणी फिरू नये, असे आवाहन या अभ्यासकांनी केले आहे.


























































