
अंधेरी आणि जोगेश्वरीतील पर्जन्य जलवाहिन्या, नाल्यांच्या रुंदीकरणाबरोबर पर्जन्य जलवाहिन्या व नाल्यांच्या संरक्षक भिंतीची डागडुजी होणार आहे. त्यामुळे पावसाळय़ात अतिवृष्टीमुळे साचणाऱया पाण्याचा निचरा जलदगतीने होणार आहे. त्यासाठी 24 कोटींचा खर्च येणार असून के/पश्चिम विभागातील अंधेरी, वर्सोवा, लोखंडवाला, जोगेश्वरी पश्चिमेतील रहिवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
पावसाळय़ात एकाच दिवसात एक ते दीड महिन्याचा पाऊस पडू लागला आहे. त्यात समुद्राला भरती असली तर मुंबईतील अनेक भागांमध्ये पाणी साचण्याचे प्रकार घडतात. पावसाळय़ात अतिवृष्टी किंवा मुसळधार पाऊस झाला की पालिकेच्या के/पश्चिम विभागातील अंधेरी-जोगेश्वरी पश्चिमेत अनेक छोटय़ा-मोठय़ा नाल्यांतून पाण्याचा निचरा होण्यास अडथळा येतो. पावसाळय़ापूर्वी पर्जन्यवाहिन्यांच्या रुंदीकरणाबरोबर पर्जन्यवाहिन्या व नाल्यांच्या संरक्षक भिंतीची डागडुजी केली जाणार आहे. काही ठिकाणी संरक्षक भिंतींची रुंदी कमी असल्यामुळे पावसाळय़ात नाल्यातील पाणी रस्त्यावर येते. त्यामुळे अशा संरक्षक भिंतींची रुंदीही वाढवण्यात येणार आहे. डागडुजी आणि संरक्षक भिंतींचे रुंदीकरण सिमेंट काँक्रीटने केले जाणार आहे. यासाठी 24 कोटी 36 लाख 56 हजार रुपयांचा खर्च येणार आहे. पालिकेने त्यासाठी कमला कन्स्ट्रक्शन या कंपनीची निवड केली असून पावसाळा वगळता 18 महिन्यांत हे काम पूर्ण करावे लागणार आहे.
इथे होणार पर्जन्यजलवाहिन्या/नाल्यांची कामे
वर्सोव्यातील देवाच्या वाडीजवळ जे.पी. रोडला छेदणारा कल्व्हर्ट, एस.व्ही.पी. नगर येथे वामनराव महाडिक मार्गाच्या शेवटी पाणी बाहेर जाण्याचा मार्ग, वर्सोवा किरण नगर ते धनलक्ष्मी बिल्डिंग, सिद्धार्थनगरला छेदणारा मार्ग, मंगेश सोसायटी, क्वारी रोड ते न्यू लिंक रोड बाजूची पर्जन्यजलवाहिनी, अंधेरीतील वीरा देसाई रोड ते चित्रलेखा नाल्याची पुनर्रचना-बांधकाम, अंधेरीतील सलामिया नाल्याची दुरुस्ती, जोगेश्वरीतील बेहराम बाग रोड सिग्नल ते पोल, लोखंडवाला मागील रस्त्यावरील लिंक रोड ते 5 स्पाईस हॉटेल मार्ग, जोगेश्वरीतील घोष रोड ते अब्बा रेसिडन्सीपर्यंत, सफी सय्यद मार्गाच्या दोन्ही बाजूला, काजूपाडा जंक्शन ते ओशिवरा नदीपर्यंतचा लिंक रोड.






























































