
मुंबईतील वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर 14 एप्रिलला ‘भारतरत्न’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दादरच्या चैत्यभूमी स्मारकात गर्दी करू नका, ऑनलाइन तसेच थेट प्रक्षेपणाच्या माध्यमातून दर्शन घ्या, असे आवाहन मुंबई महापालिकेने अनुयायांना केले आहे. दरम्यान, चैत्यभूमी येथे येणाऱया अनुयायांची सुरक्षेचे सर्व नियम पाळून कोरोना चाचणी केली जाणार आहे.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार ‘भारतरत्न’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनाच्या निमित्ताने दादर येथील चैत्यभूमी स्मारक येथे करण्यात येत असलेल्या पूर्वतयारीची अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी आज पाहणी केली. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदा विशेष व्यवस्थेसह आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत आहे. अनुयायांनी यंदा घरी राहूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करावी, असे आवाहन जयस्वाल यांनी केले आहे. यंदाच्या 130 व्या जयंती दिनाच्या पार्श्वभूमीवर ही सर्व कामे सध्या सुरू आहेत.





























































