नगरसेवकांवर बेकायदा बांधकामे पाडण्याची जबाबदारी,धोरणाला शिवसेनेचा विरोध

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, मुंबई

मुंबईतील बेकायदा बांधकामे हटवण्याची जबाबदारी नगरसेवकांच्या गळय़ात मारण्याच्या पालिका प्रशासनाच्या धोरणाविरोधात आज शिवसेनेने प्रशासनाचे कान उपटले. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अनेक ठिकाणी बेकायदा बांधकामे उभी राहत असताना अशा अतिक्रमणांवर कारवाईची जबाबदारी ढकलणाऱ्या प्रशासनाचा शिवसेनेने निषेध केला.

‘के’ पूर्व विभाग अंधेरीतील भूखंडावर मनोरंजन मैदान, उद्यान अशा कामांसाठी आरक्षित भूखंड ताब्यात घेऊन विकसित करण्यासंदर्भातील प्रस्ताव आज प्रशासनाने सुधार समितीच्या बैठकीत मांडला. संबंधित जागेवर म्हशींचे गोठे आणि शेकडो झोपडय़ा असल्यामुळे आतापर्यंत हा भूखंड विकसित झालेला नाही. मात्र या ठिकाणची बेकायदा बांधकामे हटवण्यासाठी विभाग कार्यालय आणि स्थानिक नगरसेवकांच्या सहकार्याने अतिक्रमणमुक्त करून महापालिकेच्या ताब्यात घेण्याचा मुद्दा प्रस्तावात मांडला. यावर शिवसेनेसह सर्वपक्षीयांनी आक्षेप घेतला. प्रशासन आपली जबाबदारी नगरसेवकांवर ढकलत असेल तर त्यासाठी आवश्यक अधिकार आणि यंत्रणाही पुरवावी असे सुधार समिती अध्यक्ष दिलीप (मामा) लांडे म्हणाले. जिथे अतिक्रमण हटवणे पालिकेला शक्य नाही असे भूखंड ताब्यात घेण्यात पालिका अपयशी ठरते अशा ठिकाणी नगरसेवकांवर जबाबदारी कशी ढकलता, असा सवालही त्यांनी केला.