पालिकेच्या सीबीएसई, आयसीएसई शाळांचे प्रवेश आजपासून

2110

मुंबई महापालिका शिक्षण विभागाच्या वतीने सुरू करण्यात येणाऱ्या सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाच्या मुंबई पब्लिक स्कूलची प्रवेशप्रक्रिया 27 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. विद्यार्थ्यांना या शाळांमध्ये मोफत प्रवेश दिला जाणार असून उद्यापासून प्रवेशअर्ज ऑफलाइन तसेच ऑनलाइन उपलब्ध होतील, अशी माहिती मुंबई महापालिका शिक्षणाधिकारी महेश पालकर यांनी दिली. ऑनलाइन प्रवेशअर्ज  http://portal.mcgm.gov.in या वेबसाइटवर उपलब्ध होतील.

पर्यावरण, पर्यटन आणि राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेनुसार मुंबई महापालिकेतर्फे सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाच्या शाळा सुरू होणार आहेत. महापालिका शिक्षण समिती सदस्य साईनाथ दुर्गे यांनी या शाळा सुरू करण्याचा प्रस्ताव शिक्षण समितीच्या बैठकीत मांडला होता. शिक्षण हक्क कायद्यातील तरतुदीनुसार ज्युनियर केजीसाठी चार वर्षे पूर्ण असणाऱ्या तसेच इयत्ता पहिलीसाठी सहा वर्षे पूर्ण असणाऱ्या पाल्यांना प्रवेश दिला जाणार आहे. 25 जुलै 2019 पर्यंत ही वयोमर्यादा पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांनाच प्रवेशासाठी पात्र धरण्यात येईल. तसेच शाळेपासून 3 किलोमीटर अंतरावर राहणाऱ्या पाल्याला प्रवेशात प्राधान्य दिले जाणार आहे. तसेच अभ्यासक्रमात तृतीय भाषा म्हणून मराठी विषय सक्तीचा असून इतर महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या सर्व सोयीसुविधा मुंबई पब्लिक स्कूलमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनादेखील मिळणार आहे. प्रत्येक वर्गासाठी येणाऱ्या प्रवेशअर्जाची संख्या 40 च्या पुढे गेल्यास लॉटरी पद्धतीने विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे.

या शाळांमध्ये प्रवेश

  • मुंबई पब्लिक स्कूल – आयसीएसई बोर्ड – वुलन मिल्स, माहीम (पश्चिम)
  • मुंबई पब्लिक स्कूल – सीबीएसई बोर्ड – पूनम नगर, जोगेश्वरी (पूर्व)

प्री-प्रायमरी ते दुसरीपर्यंतचे वर्ग सुरू

शैक्षणिक वर्ष 2020-21 म्हणजेच येत्या एप्रिल आणि जूनपासून प्री-प्रायमरी ते दुसरीपर्यंतचे वर्ग सुरू केले जाणार आहेत. विद्यार्थी संख्या कमीत कमी 10 असल्यास इयत्ता तिसरी ते सहावीचे वर्ग सुरू केले जातील, अशी माहिती मुंबई महापालिका शिक्षणाधिकारी महेश पालकर यांनी दिली.

प्रवेशाचे वेळापत्रक

  • ऑनलाइन, ऑफलाइन प्रवेशअर्ज – 27 फेब्रुवारी ते 12 मार्च
  • (ऑफलाइन प्रवेशअर्ज शाळेमध्ये सकाळी 10.30 ते दुपारी 4.30 या वेळेत मिळतील. याच वेळेत भरलेले अर्ज जमा करावेत.)
  • अर्जांची छाननी, पालक समुपदेशन – 13 मार्च ते 24 मार्च
  • प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांची पहिली यादी – 24 मार्च
  • विद्यार्थी संख्या जास्त असल्यास लॉटरी प्रक्रिया – 26 ते 28 मार्च
  • अंतिम यादी जाहीर – लॉटरी प्रक्रिया पूर्ण झाल्यावर दुसऱ्या दिवशी
  • नावनोंदणी – 31 मार्चपर्यंत
  • शैक्षणिक वर्षाला सुरुवात – सीबीएसई एप्रिल 2020, आयसीएसई जून 2020
आपली प्रतिक्रिया द्या