मुंबई महानगरपालिका सुरू करणार ‘आयसीएसई’, ‘सीबीएसई’ बोर्डाची शाळा

126

स्पर्धात्मक जगामध्ये टिकून राहण्यासाठी आवश्यक असणारे अभ्यासक्रम शिकवणारे शिक्षण मुलांना मिळावे, यासाठी आर्थिक बोजा सहन करूनही पालक ‘आयसीएसई’ आणि ‘सीबीएसई’ बोर्डाच्या शाळांकडे वळतात. पालकांची ही मानसिकता लक्षात घेऊन मुंबई महानगरपालिका आता प्रायोगिक तत्त्वावर ‘आयसीएसई’ आणि ‘सीबीएसई’ बोर्डाची शाळा सुरू करणार आहे. या शाळांच्या प्रस्तावाला आज शिक्षण समितीने मंजुरी दिली.

शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनानुसार, नुकत्याच पार पडलेल्या महानगरपालिकेच्या शिक्षण समितीच्या बैठकीत महानगरपालिका शिक्षण विभागाने ‘आयसीएसई’, ‘सीबीएसई’ बोर्डाच्या विनामूल्य शाळा सुरू कराव्यात, असा प्रस्ताव मांडला होता. शिक्षण समितीच्या सकारात्मक प्रतिसादानंतर हा प्रस्ताव महानगरपालिका आयुक्तांकडे अभिप्रायासाठी पाठवण्यात आला होता. त्यावर मनपा आयुक्तांनीही सकारात्मक अभिप्राय दिल्यानंतर शिक्षण समिती अंजली नाईक यांनी आज हा प्रस्ताव मंजूर केला. त्याला सर्वपक्षीयांनी पाठिंबा दिला.

माहीममध्ये ‘आयसीएसई’ तर जोगेश्वरीत ‘सीबीएससी’ची शाळा

पालिका प्रायोगिक तत्त्वावर शैक्षणिक वर्ष 2020-21 पासून जी/उत्तर विभागातील (माहीम) वूलन मिल मनपा शाळा येथे आयसीएसई (ICSE) बोर्डाची शाळा सुरू करणार आहे तर के/पूर्व विभागातील, जोगेश्वरी पूर्वमधील पूनमनगर येथील मनपा शाळा येथे सीबीएसई (CBSE) बोर्डाची ज्युनिअर आणि सिनिअर के-जी, इयत्ता पहिली ते सहावीचे वर्ग सुरू करणार आहेत. या शाळा विनामूल्य असणार आहेत. दरम्यान, या उपक्रमासाठी आयसीएसई (ICSE) व सीबीएसई (CBSE) बोर्डाची मान्यता आवश्यक असल्याने त्यासाठी लागणार्‍या निधीची तरतूद शिक्षण विभागाच्या अर्थसंकल्पातून करण्यात येईल, असे पालिका आयुक्तांनी सांगितले.

पालिका शाळांमध्ये मिळणार दर्जेदार शिक्षण

वरळी आणि जोगेश्वरीत आयसीएसई आणि सीबीएसई बोर्डाच्या शाळा सुरू करण्याच्या पालिकेच्या निर्णयाचा मला आनंद होत आहे. पालिका राबवत असलेल्या शैक्षणिक धोरणाचा हा मोठा विजय आहे. पालिकेच्या शाळांमध्ये दर्जेदार शिक्षणाची सुरुवात झाली आहे.  – आदित्य ठाकरे, शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, पर्यावरणमंत्री

आपली प्रतिक्रिया द्या