
सफाई कामगार वसाहतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. याबाबतच्या प्रस्तावाला स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. या प्रकल्पात एकूण 1 हजार 988 घरे बांधण्यात येणार आहेत. यामध्ये 300 चौरस फुटांची 1 हजार 844 घरे असून प्रत्येक घराच्या बांधकामासाठी 20 लाख 70 हजार रुपयांचा खर्च येणार आहे. तर 600 चौरस फुटाची 144 घरे बांधण्यात येणार असून प्रत्येक घराच्या बांधकामासाठी 41 लाख 41 हजार रुपयांचा खर्च होणार आहे. स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी ही माहिती दिली.
पालिकेच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱया सफाई कामगारांच्या घरांच्या पुनर्विकास प्रकल्पात अंधेरी पश्चिम आणि वांद्रे पश्चिम येथील सफाई कामगारांच्या चार वसाहतींचा पुनर्विकास करण्यात येणार आहे. या पुनर्विकासाच्या 560 कोटी रुपयांच्या प्रस्तावाला बुधवारी स्थायी समितीने मंजुरी दिली. या प्रकल्पात प्रि. फॅब्रिकेटेड पद्धतीने इमारती बांधण्यात येणार आहेत. अवघ्या 12 महिन्यांत या इमारती उभ्या राहणार आहेत. वसाहतींचा पुनर्विकास झाल्यावर अनेक वर्षांपासून या वसाहतीत राहाणाऱया कामगारांना कायमस्वरुपी भाडय़ाने ही घरे देण्यात यावी असे निर्देश प्रशासनाला देण्यात आल्याचे जाधव यांनी सांगितले.
‘आश्रय’ योजनेतून पुनर्विकास
पालिकेच्या माध्यमातून ‘आश्रय’ योजने अंतर्गत महानगर पालिका हा पुनर्विकास करत आहे. लवकरच या घरांच्या बांधकामाला सुरुवात होणार असल्याचे जाधव यांनी सांगितले. सफाई कामगार नेहमीच स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करतात. कोविड काळातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. प्रतिबंधित वस्त्यांमध्ये जिवाची पर्वा न करता ते काम करीत आहेत. त्यामुळे ही निवासस्थाने कामगारांना कायमस्वरूपी माफक भाडय़ाने मिळणे गरजेचे आहे. याबाबत प्रशासनाने धोरण तयार करावे असे निर्देश प्रशासनाला दिल्याचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी सांगितले.





























































