मुंबईत अजित पवार गट स्वबळावर लढणार, प्रचाराची जबाबदारी मलिकांकडे

राज्यातील सत्ताधारी महायुतीत असणारा अजित पवार गट बहुतांश महानगरपालिकांत वेगळा लढणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. मुंबईत स्वबळावर 100 जागा लढण्याचा विचार करत असून प्रचाराची जबाबदारी पक्षाचे मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांच्यावर असणार आहे.

अजित पवार गट मुंबईत मलिकांच्या नेतृत्वात लढणार असले तर त्यांना सोबत घेण्यास भाजप आणि शिंदे गटाने विरोध केला आहे. मुंबईत महायुती करण्यासाठी प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी पुढाकार घेतला होता, मात्र त्यात त्यांना फारसे यश आले नाही. त्यानंतर मुंबईत मलिकांच्या नेतृत्वातच स्वबळावर लढण्याचा निर्णय अजित पवार गटाने घेतला आहे. मुंबईत एकंदर किती जागा लढणार हे 30 डिसेंबरला स्पष्ट होईल, असे सुनील तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.

मलिक कुटुंबीयांच्या घरात तिघांना उमेदवारी

अजित पवार गटाकडून मलिक कुटुंबात तीन जणांना उमेदवारी दिली जाणार आहे. यामध्ये नवाब मलिक यांचे बंधू कप्तान मलिक प्रभाग क्रमांक 165, बहीण डॉक्टर सईदा खान प्रभाग क्रमांक 168 मधून तर कप्तान मलिक यांची सून बुशरा मलिक प्रभाग क्रमांक 170 मधून निवडणूक लढवणार आहेत.