
मुंबई महापालिका निवडणुकीचा वॉर्ड क्र. 54 चा निकाल जाहीर झाला असून शिवसेना ((उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार अंकित सुनील प्रभू यांचा भरघोस मतांनी विजय झाला. अंकित प्रभू यांच्या विजयानंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. अंकित प्रभू यांच्या प्रभाग क्रमांक 54 मधील मतदानाची गोरेगाव पश्चिमेकडील उन्नत नगर मुंबई पब्लिक स्कूल येथे मतमोजणी करण्यात आली. त्यांनी भाजप महायुतीच्या विप्लव अवसरे यांना पराभूत केले.
विजयी झाल्यानंतर मतमोजणी केंद्रातून बाहेर पडताना अंकित प्रभू यांनी सर्व शिवसैनिक आणि मनसैनिकांना तसेच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना हात उंचावून धन्यवाद दिले. उन्नत नगर मुंबई पब्लिक स्कूलच्या आवारात विजयाचा प्रचंड मोठा जल्लोष करण्यात आला. गुलालाची उधळण करत तसेच शिवसेना, मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे झेंडे उंचावत कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसे यांच्या सहकाऱ्यांनी जी काही मेहनत घेतली त्या मेहनतीच्या जोरावर मी हा विजय संपादन करू शकलो. हा विजय माझा नसून या सर्व कार्यकर्त्यांचा आहे. कारण मेहनत घेतली नसती तर हा विजय मला कधीच मिळवता आला नसता. उद्यापासूनचा प्रत्येक दिवस आमच्या या कार्यकर्त्यांसाठी, मतदारांसाठी असणार आहे, अशी प्रतिक्रिया विजयी उमेदवार अंकित प्रभू यांनी दिली.
सुनील प्रभू – गोरेगावमधील मतदारांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर विश्वास दाखवून मतांच्या रुपात आशीर्वाद दिला आहे. या आशीर्वादामुळे अंकित प्रभू यांचा भरघोस मतांनी विजय झाला आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते सुनील प्रभू यांनी दिली आहे.





























































