दादरचा शिवसेनेचा गड बुलंद राहिला! दादरमध्ये गद्दारांना पाणी पाजले, धारावीकरांची मशालीला साथ

मुंबई महानगरपालिका निवडणुकीत जी-उत्तर विभागातल्या अकरा वॉर्डांपैकी सात वॉर्डमध्ये शिवसेना-मनसेच्या उमेदवारांनी दणदणीत विजय मिळवला आहे. धारावीकरांनी मशालीला साथ दिली, तर दादरचा शिवसेनेचा बुलंद गड शिवसेना-मनसेच्या शिलेदारांनी अत्यंत भक्कमपणे राखला. दादरमध्ये सुरवातीला काँटे की टक्कर झाली, पण गद्दारांना पाणी पाजत शिवसेनेची मशाल तेजाने तळपली.

धारावी, माहीम, दादर असा विभाग असलेल्या जी उत्तर विभागातील माहीमच्या 182 वॉर्डमध्ये शिवसेनेचे मिलिंद वैद्य, धारावीतील वॉर्ड क्रमांक 185मध्ये टी.एम. जगदीश, वॉर्ड क्रमांक 186 मध्ये अर्चना शिंदे, वॉर्ड क्रमांक 187 मध्ये जोसेफ कोळी, वॉर्ड क्रमांक 189 मध्ये हर्षला मोरे आणि दादरमधील वॉर्ड क्रमांक 191 मध्ये  विशाखा राऊत आणि वॉर्ड क्रमांक 192 मध्ये मनसेचे यशवंत किल्लेदार विजयी झाले.

निकाल राखून ठेवले होते

वॉर्ड क्रमांक 185 मध्ये शिवसेनेचे टी.एम. जगदीश आणि भाजपचे रवी राजा यांच्यात लढत होती. तर 189 मध्ये शिवसेनेच्या हर्षला मोरे आणि भाजपच्या मंगल गायकवाड यांच्यातील मतमोजणीच्या वेळेस ईव्हीएममध्ये बिघाड झाला होता. कारण या मशीनमध्ये निकाल हे स्क्रीनवर दिसत नव्हते. त्यामुळे हे निकाल राखून ठेवले होते. अखेर हे निकाल राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात आले. पण निवडणूक आयोगाने अखेर त्यावर निर्णय देत टी.एम. जगदीश आणि हर्षला मोरे यांना विजयी घोषित केले.

विशाखा राऊत यांनी घेतली आघाडी

दादरमधील वॉर्ड क्रमांक 191मध्ये शिवसेनेच्या विशाखा राऊत आणि शिंदे गटाच्या प्रिया सरवणकर यांच्यातील प्रतिष्ठेच्या लढतीकडे संपूर्ण मुंबईचे लक्ष होते. सुरुवातीला प्रिया सरवणकर आघाडीवर होत्या; पण चौथ्या-पाचव्या फेरीनंतर विशाखा राऊत यांनी घेतलेली आघाडी अखेरच्या सहाव्या फेरीपर्यंत कायम ठेवत विजय मिळवला.

किल्लेदारांनी राखला किल्ला

दादरच्या वॉर्ड क्रमांक 192मध्ये मनसे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार यशवंत किल्लेदार आणि शिंदे गटाच्या प्रीती पाटणकर यांच्यातील अत्यंत प्रतिष्ठेच्या लढतीकडेही सर्व राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागले होते. किल्लेदार यांनी जोरदार मुसंडी मारत सुमारे चौदाशे मतांनी प्रीती पाटणकर यांचा दणकून पराभव केला.

पश्चिम उपनगरात गद्दारांची धुळधाण उडाली! गोरेगाव, मालाडमध्ये ठाकरेंचाच दबदबा; शिवसेना आणि मनसेच्या उमेदवारांचा दणदणीत विजय

काँग्रेसचे दोन उमेदवार विजयी

दरम्यान जी उत्तर विभागातील वॉर्ड क्रमांक 183 मधून काँग्रेसच्या आशा काळे आणि वॉर्ड क्रमांक 184 मधून साजिदा बब्बू खान, वॉर्ड क्रमांक 188 मधून शिंदे गटाचे भास्कर शेट्टी विजयी झाले.