
मुंबईत मार्चमध्ये कोरोनाने शिरकाव केल्यानंतर पालिकेच्या माध्यमातून अहोरात्र काम करण्यात येत आहे. यामध्ये शेकडो कोविड केअर सेंटर, जम्बो कोविड सेंटर्स, डॉक्टर्स, नर्स, आरोग्य कर्मचाऱयांची नियुक्ती आणि औषधोपचारासाठी पालिकेने आतापर्यंत तब्बल 1470.95 कोटींचा खर्च केला आहे. कोरोना लढय़ासाठी 450 कोटींचा निधी आकस्मिक कामांकरिता अर्थसंकल्पातून खर्च करण्यात आला असून आणखी 400 कोटींच्या निधीची गरज असल्याचे पालिकेने म्हटले आहे. त्यामुळे अर्थसंकल्पातून हा निधी वळता करण्यासाठी पालिकेने स्थायी समितीकडे प्रस्ताव सादर केला आहे.
मार्चपासून कोरोना लढय़ासाठी पालिकेच्या माध्यमातून अनेक आरोग्य सुविधा निर्माण करण्यात आल्या. त्यामुळे आकस्मिक खर्चात मोठय़ा प्रमाणात वाढ झाली. खर्च वाढल्याने आकस्मिक निधी संपल्यानंतर अर्थसंकल्पाच्या शिलकीतून अतिरिक्त 450 कोटी रुपये कोरोना काळातील कामांकरिता आकस्मिकता निधीत वळते करण्यात आले आहेत. कोरोना उपाययोजनांसाठी हा निधीदेखील खर्च झाला असून शिलकीतून आणखी 400 कोटींचा निधी वळता करावा लागणार असल्याचे पालिका प्रशासनाचे म्हणणे आहे. त्यामुळे हा निधी अर्थसंकल्पातून वळता करण्यासाठी पालिकेच्या वित्त विभागाकडून स्थायी समितीला प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.
असा आहे जमा-खर्च
वर्षाच्या सुरुवातीला पालिकेकडे आकस्मिकता निधीत 852 .57 कोटी निधी शिल्लक होता. राज्य सरकारकडून कोविडच्या खर्चासाठी 60 कोटींचा निधी देण्यात आला होता. तसेच 2020-21 च्या अर्थसंकल्पात आकस्मिकता निधीसाठी 300 कोटींची तरतूद करण्यात आली होती. या एकूण 1212 कोटींपैकी 1182 कोटी आधीच खर्च झाले आहेत. त्यामुळे अर्थसंकल्पाच्या 1644 कोटी रुपये शिलकीतून 450 कोटी आकस्मिकता निधीतून आधीच प्रशासनाने वळते केले असून विविध कामांसाठी खर्च करण्यात आले आहेत. तर आता आणखी 400 रुपये खर्च करण्यात येणार आहेत.





























































