पालिकेच्या अर्थसंकल्पात शिवसेनेची वचनपूर्ती, ‘वचननामा’ पाळल्याने मुंबईकरांना दिलासा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
bmc-2

मुंबईची वाढती तहान भागवण्यासाठी समुद्राचे पाणी गोडे करणे, सुंदर शहरासाठी उड्डाणपुलांखालील जागा-पदपथ-वाहतूक बेटांचे सौंदर्यीकरण, उद्याने-मैदानांना नवी झळाळी, लहान मुलांना सुरक्षेचे धडे यासह अद्ययावत शिक्षणासह कोणतीही करवाढ नसलेला पालिकेचा आतापर्यंतचा ‘मेगा बजेट’ सादर झाल्यामुळे अर्थसंकल्पातून शिवसेनेने वचनपूर्ती केल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे कोरोनाविरोधात लढा सुरू असतानाही पालिकेने विकासकामे सुरूच ठेवल्याने मुंबईच्या नियोजनबद्ध विकासाला गती मिळणार आहे.

पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी बुधवारी पालिकेचा 39038.83 कोटींचा मेगा बजेट स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांना सादर केला. या बजेटमध्ये मुंबईच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी महत्त्वाकांक्षी योजना पालिकेच्या माध्यमातून मांडण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे 2017 च्या निवडणुकीत शिवसेनेने मुंबईकरांना दिलेल्या बहुतांशी आश्वासनांची पूर्तता या वचननाम्यात करण्यात आल्याचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना अद्ययावत शिक्षण देण्यासाठी डिजिटल शिक्षण, अद्ययावत उपक्रम, मुले-विद्यार्थ्यांची सुरक्षितता, कौशल्याभिमुख उपक्रम, संगीत अकादमी असे अनेक उपक्रम राबविण्यासाठी 1 कोटी 19 लाखांची वाढ असलेला 2945.78 कोटींचा शैक्षणिक अर्थसंकल्प सादर करण्यात आला. यामध्ये सीबीएसई बोर्डाच्या दहा शाळा सुरू करण्याचा निर्णय सध्याच्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांसाठी करीअरचा मार्ग ठरणार आहे. मुंबईला वेगवान बनवणारा आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतील कोस्टल रोडसारखा प्रकल्प पूर्णत्वाकडे जात असल्यामुळे मुंबईची वाहतूककोंडीतून सुटका होणार असून प्रवासही वेगवान होणार असल्याचे यशवंत जाधव यांनी सांगितले.

आदित्य ठाकरे यांच्या संकल्पना प्रत्यक्षात

मुंबईला सुरक्षित, निरोगी, स्वच्छ आणि सुंदर बनवण्यासाठी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे सातत्याने पुढाकार घेऊन नवनवे उपक्रम राबवण्यासाठी पुढाकार घेत आहेत. यामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या डिजिटल शिक्षणासह प्लॅस्टिक पिशव्यांवर बंदी, मियावाकी वनीकरण, कचऱयावर प्रक्रिया, सौरऊर्जेला प्राधान्य, इलेक्ट्रिक बस, उद्याने-मैदानांचा विकास, चौपाटय़ांचे सौंदर्यीकरण अशा अनेक महत्त्वाकांक्षी योजना राबविण्यात येत आहेत. यासाठी पालिकेने या वर्षीदेखील भरघोस तरतूद केली आहे. कोरोनामुळे आरोग्य विभागाच्या सक्षमीकरणासाठी वाढीव तरतूद करण्यात आली आहे.

महत्त्वाचे निर्णय

 प्रत्येक विभागात पाच उद्याने, वॉल पेंटिंग, मुंबईबाहेरून येणाऱयांसाठी 24 प्रभागांत 108 स्वच्छतागृहे.
 मुंबईची वाढती पाण्याची गरज वाढवण्यासाठी दररोज 400 दशलक्ष लिटर पाणी गोडे करणार
 कोस्टल रोडच्या कामासाठी 2 हजार 07 कोटींची तरतूद, 2023 मध्ये पूर्तता.
 हरित ऊर्जाअंतर्गत 20 मेगावॅट क्षमतेचा जलविद्युत प्रकल्प व 80 मेगावॅट क्षमेतचा तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प, 600 मेट्रिक टन आणि 1200 मेट्रिक टन कचऱयापासून वीजनिर्मिती करणारे प्रकल्प. (65 कोटी तरतूद)
 गोरेगाव-मुलुंड जोडरस्त्यासाठी 1300 कोटींची तरतूद
 21 पूल पाडून नव्याने बांधणार, 47 पुलांचा मोठय़ा दुरुस्त्या आणि 144 पुलांच्या किरकोळ दुरुस्त्या.
 अतिवृष्टीतील पूरनियंत्रणाच्या कामांसाठी 58 ठिकाणांकरिता 715.51 कोटींच्या निविदा मागवण्यात आल्या असून या वर्षीच्या अर्थसंकल्पात 150 कोटींची तरतूदही करण्यात आली आहे.
 पदपथ, वाहतूक बेटे, उड्डाणपुलांखाली जागांच्या सौंदर्यीकरणासाठी 200 कोटींची तरतूद. डबेवाला भवन उभारणार. ऐतिहासिक वास्तूंचे सुशोभीकरण – 150.08 कोटी.
 ‘बेस्ट’च्या आर्थिक सक्षमीकरणासाठी 750 कोटी, अग्निशमन दल 199.47 कोटी, मलनिस्सारण 1060.06 कोटी, पाणीपुरवठा 1232.17 कोटी
 नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी 1149.74 कोटी, उद्यानांसाठी 126.53 कोटी, वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानासाठी 49.67 कोटी.