इलेक्ट्रिक गाडय़ा, चार्जिंग स्टेशन सुरक्षेसाठी पालिकेची गाइडलाइन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईला प्रदूषणमुक्त करण्यासाठी पालिकेकडून ‘इलेक्ट्रिक वाहनांना’ प्रोत्साहन दिले जात असल्यामुळे इलेक्ट्रिक वाहने आणि चार्जिंग स्टेशनच्या सुरक्षेसाठीही गाइडलाइन तयार करण्यात येणार आहेत. यामध्ये सार्वजनिक चार्जिंग स्टेशन, खासगी चार्जिंग स्टेशन आणि इलेक्ट्रिक वाहनांमध्ये आगीच्या दुर्घटना टाळण्यासाठी नियमावली तयार करण्यात येत असल्याचे प्रमुख अग्निशमन दल अधिकारी हेमंत परब यांनी सांगितले.

महाराष्ट्र शासनाचा पर्यावरण विभाग आणि पालिकेच्या माध्यमातून सुरू असलेल्या प्रयत्नांमुळे मुंबईत इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वाढत आहे. मात्र काही वेळा इलेक्ट्रिक वाहने आणि चार्जिंग स्टेशनमध्ये भडका उडत असल्याचे प्रकारही घडत आहेत. या पार्श्वभूमीवर आगामी काळात जास्तीत जास्त वाहने इलेक्ट्रिक स्वरूपाची आणली जाणार असल्यामुळे पालिकेकडून आतापासूनच काळजी घेण्यात येत आहे. यासाठी अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीव कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली आज एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. इलेक्ट्रिक गाडय़ांमध्ये आगी का लागतात, चार्जिंग स्टेशनची सुरक्षा याबाबत नियमावली तयार करण्यात येणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

वाहनांची बॅटरी चार्ज करण्यासाठी स्वतंत्र धोरण

पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक वाहनांना मुंबईकरांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र या वाहनांची बॅटरी चार्ज करण्याच्या दृष्टीने स्वतंत्र धोरण नसल्याने याबाबत गरजांनुसार विविध स्तरावर अंमलबजावणी करण्यावर मर्यादा येत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई क्षेत्रासाठी स्वतंत्रपणे ‘इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जिंग धोरण’ असावे या उद्देशाने आयोजित या बैठकीमध्ये इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जिंगबाबत विविध मुद्दय़ांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी पर्यावरण खात्याचे उपायुक्त सुनील गोडसे यांनी उपस्थित होते.