महापालिका मुख्यालय गुलाबी रंगाने उजळले!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आंतरराष्ट्रीय बालिका दिवसाच्या निमित्ताने पालिका मुख्यालयाच्या इमारतीला गुलाबी रंगाची आकर्षक रोषणाई करण्यात आली. यंदाच्या बालिका दिवसाचे घोषवाक्य ‘डिजिटल जनरेशन, अवर जनरेशन’ असे आहे. आधुनिक युगात मुलांइतकाच मुलींनाही अद्ययावत तंत्रज्ञानाचा आणि साधनांच्या वापराचा अधिकार मिळावा, हा या घोषवाक्यामागील जनजागृतीपर उद्देश आहे.

2011 पासून दरवर्षी 11 ऑक्टोबर रोजी संयुक्त राष्ट्रसंघाने आंतरराष्ट्रीय बालिका दिवस साजरा करण्यास सुरुवात केली आहे. जगभरातील बालिकांना भेडसावणाऱया समस्यांबाबत जनजागृती व्हावी, बालिकांना त्यांचे अधिकार मिळावेत या हेतूने दरवर्षी 11 ऑक्टोबर रोजी हा दिवस साजरा करण्यात येतो. आंतरराष्ट्रीय स्तरावर बालिका दिवस साजरा व्हावा यासाठी संयुक्त राष्ट्रसंघामध्ये कॅनडा या देशाने नेतृत्व केले होते. या पार्श्वभूमीवर, कॅनडाचे मुंबईतील राजदूत केथ कॅन यांनी पालिका प्रशासनाला पत्र लिहून 11 ऑक्टोबर  रोजी पालिका मुख्यालयाची इमारत गुलाबी रंगाने विद्युत रोषणाईने उजळवावी अशी विनंती केली होती. या विनंतीचा मान राखत तसेच बालिकांच्या हक्क, अधिकारांविषयी जनजागृती व्हावी या उद्देशाने आज पालिका मुख्यालय इमारत गुलाबी रंगातील विद्युत दिव्यांच्या रोषणाईने उजळून निघाली आहे.