पालिका ठरतेय विस्थापित, कष्टकऱयांचा आधारवड; दररोज 4 लाख 61 हजार जेवण पाकिटांचे मोफत वितरण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
फोटो - संदीप पगडे

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, लागू करण्यात आलेल्या संचारबंदीमुळे मुंबईत अडकून पडलेल्या विस्थापित, कष्टकरी, कामगारांसाठी मुंबई महानगरपालिका मोठा आधारवड ठरली आहे. या विस्थापित, कष्टकरी, मजुरांना पालिकेच्या 24 विभागातील 734 केंद्रांमधून दररोज दोनवेळची मिळून 4 लाख 61 हजार इतकी तयार जेवणाची पाकिटे विनामूल्य दिली जात आहेत.

मुंबईमध्ये मोठया संख्येने कामगार, मजूर, विस्थापित वास्तव्यास आहेत. या विस्थापित व कष्टकरी तसेच लॉकडाऊनच्या काळात मुंबईत अडकलेल्या गरजू व्यक्तींसाठी दोनवेळचे तयार जेवण पुरविण्याचे काम 28 मार्च 2020 पासून सातत्याने केले जात आहे. मुंबईतील विविध लोकप्रतिनिधी, खासदार, आमदार, संबंधित स्थानिक नगरसेवक यांच्या सहकार्याने समन्वय साधून अन्नाचे वितरण करण्यात येत आहे.

जेवण पोहोचवण्यासाठी ‘बेस्ट’ सेवा
वितरण केंद्रांच्या माध्यमातून सुरुवातीला रस्त्यावर राहणारया, बेघर व्यक्तींना जेवण देण्यात येत होते. तथापि, विस्थापित व कष्टकरी, कामगार, मजूर अशा सगळ्यांची गरज लक्षात घेता या कामाची व्याप्ती वाढविण्यात आली आहे. यासाठी वेगवेगळ्या कम्युनिटी किचन्सच्या माध्यमातून जेवण तयार केले जाते. बेस्ट प्रशासनाच्या 48 वातानुकूलित बसेसद्वारे मुंबईतील 24 विभाग कार्यालयांच्या क्षेत्रात एकूण 734 केंद्रांवर हे जेवण पोहोचविले जाते. दुपारी 12 ते 2 वाजेपर्यंत आणि सायंकाळी 7 ते रात्री 10 वाजेपर्यंत अशा दोन वेळेस सर्व गरजूंना विनामूल्य तयार जेवण पुरविले जात आहे.