पालिकेचे ‘मिशन धारावी’ जगात गाजतेय! ऑस्ट्रेलियाच्या सरकारी चॅनेलनेही केले कौतुक

1146

अरुंद गल्ल्या, दाटीवाटीची वस्ती, आरोग्य सुविधांचा अभाव आणि अस्वच्छता अशा अवस्थेत धारावी कोरोनाच्या संसर्गामुळे संपून जाईल, असे वाटत होते. मात्र, मुंबई महानगरपालिकेने तातडीने केलेल्या उपाययोजनांमुळे आणि राबवलेल्या ‘मिशन धारावी’मुळे आता केवळ 88 सक्रीय रुग्ण धारावीत उरले आहेत. आतापर्यंत धारावी मॉडेलची दखल जागतिक आरोग्य संघटना, अमेरिकेचे ‘वॉशिंग्टन पोस्ट’ वर्तमानपत्राने घेतल्यानंतर आता ऑस्ट्रेलियाच्या ‘एबीसी न्यूज’ या सरकारी वृत्तसंस्थेनेही मुंबई पालिकेवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. पालिकेचे मिशन धारावी जगात गाजत आहे.

मुंबईत मार्चमध्ये कोरोनाने शिरकाव केल्यानंतर दहा लाख दाटीवाटीची लोकसंख्या असलेल्या धारावीत क्लोज काँटॅक्टमुळे कोरोना रुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढली. या भागातील 70 टक्के लोक सार्वजनिक शौचालयाचा वापर करतात. दहा बाय दहाच्या रूमध्ये सुमारे आठ ते दहा लोक या ठिकाणी राहत असल्याने कोरोनाच्या संसर्गाचा धोका वाढला होता. मात्र, पालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांच्या नेतृत्वाखाली आणि जी/उत्तरचे साहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांच्या संयमी हाताळणीमुळे आता धारावीने कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरू केली आहे.

धारावीत समूह प्रतिकारशक्ती?
धारावीतील बहुतेक भागांत कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे धारावीत समूह रोगप्रतिकारशक्ती (हर्ड इम्युनिटी) निर्माण झाली असावी, असा अंदाज काही डॉक्टर व्यक्त करत आहेत. केंद्र सरकारने नुकतेच मुंबईत केलेल्या सेरो सर्वेक्षणात झोपडपट्टीत राहणाऱया 57 टक्के लोकांमध्ये कोरोनाला प्रतिकार करणारी अँटीबॉडीज तयार झाल्याचे म्हटले होते. मात्र, अशा प्रकारची समूह प्रतिकारशक्तीची व्याख्या ही संदिग्ध आहे. त्यामुळे धारावीतील रुग्णांची संख्या केवळ समूह रोगप्रतिकार शक्तीमुळे कमी झाली आहे, असे म्हणता येत नाही, असे पालिका अधिकाऱयांचे म्हणणे आहे.

हैदराबाद, केरळने ‘धारावी मॉडेल’ स्वीकारले
लोकांच्या मनात प्रचंड भीती असताना ती दूर करून लोकांचा विश्वास जिंकून कोरोना रोखण्यासाठी काम कसे करावे, हे धारावीने देशाला शिकवले. कोरोना रोखण्यासाठी देशात धारावी मॉडेल आदर्श उदाहरण बनले. मात्र, हे सर्व पटकन झाले नाही. त्यामुळे वेळ जावा लागला. हळूहळू कोरोनाला कसे रोखता येईल, याचा अनुभव डॉक्टर, पालिका कर्मचारी, आरोग्य अधिकारी, प्रशासकीय अधिकारी यांना येऊ लागला आणि त्या रणनीतीनुसार काम सुरू झाले.

ट्रेसिंग, ट्रकिंग, टेस्टिंग, ट्रिटिंगची चतुःसूत्री
दाटीवाटीच्या धारावीत कोरोना रोखण्यासाठी ‘मिशन धारावी’अंतर्गत ट्रेसिंग, ट्रकिंग, टेस्टिंग आणि ट्रिटिंग या चतुःसुत्रीनुसार काम करण्यात आले. यालाच पुढे ‘धारावी मॉडेल’ म्हणून देशात मान्यता मिळाली. रुग्ण पालिकेकडे येण्याची वाट न बघता पालिका कर्मचारी त्यांच्याकडे जाऊन त्यांची तपासणी करू लागले. यामध्ये 47 हजार 500 घरांत डॉक्टर व खासगी क्लिनिक पोहोचून स्क्रिनिंग, फिव्हर कॅम्प घेण्यात आले. धारावीत तब्बल 3.6 लाख नागरिकांचे स्क्रिनिंग करण्यात आले. यामध्ये 8 हजार 246 ज्येष्ठांची तपासणी करून गरजेनुसार आवश्यक औषधोपचार करण्यात आले. मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून 14, 970 जणांचे स्क्रिनिंग करण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या