
मुंबईचे लसीकरण लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी पालिका वेगाने काम करीत असून शिल्लक लाभार्थ्यांना शोधून लस देण्यासाठी प्रत्येक घरी जाऊन लस देण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामध्ये सोसायटय़ा-झोपडपट्टय़ांमध्ये विशेष लसीकरण शिबीर आयोजित करून डोस देण्यात येणार आहे. पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अभिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी ही माहिती दिली. केंद्रीय आरोग्य विभागासोबत झालेल्या बैठकीनंतर लसीकरणासाठी ‘हर घर दस्तक’ मोहिमेला वेग आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
मुंबईत गेल्या वर्षी मार्चमध्ये कोरोनाने शिरकाव केल्यानंतर तब्बल दहा महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर लसीकरणाला सुरुवात झाली. यामध्ये सद्यस्थितीत पालिका, सरकार आणि खासगी मिळून 461 केंद्रांवर लसीकरण सुरू आहे. यामध्ये 18 वर्षांवरील पात्र असणाऱया 92 लाख 36 हजार 500 नागरिकांचा पहिला डोसही 13 नोव्हेंबर रोजी पूर्ण झाला आहे. या कामगिरीमुळे मुंबई महानगरपालिकेने दिल्ली, चेन्नई आणि बंगळुरूसह सर्व महापालिकांमध्ये सर्वोत्तम ठरण्याचा मान पटकावला आहे. मुंबई दुसरा डोसही देण्यातही आघाडीवर आहे. तर मुंबईबाहेरी पात्र लाभार्थ्यांना पहिला डोसही दिला जात आहे.
दुसरा डोस हुकलेल्या लाखो जणांना वॉर्ड रूममधून कॉल
पालिकेच्या माध्यमातून दररोज एक ते दीड लाखांपर्यंत लसीकरण करण्यात येत आहे. यामध्ये दुसरा डोस घेतला नसलेल्या तीन लाखांवर लाभार्थ्यांना वॉर्ड वॉर रूमच्या माध्यमातून कॉल केला जात आहे. मात्र आतापर्यंत संपर्क केलेल्या 25 टक्के जणांनी मुंबईबाहेर डोस घेतला आहे तर काहींनी दुसऱया मोबाईल नंबरवरून नोंदणी केल्याने नोंद दिसत नसल्याचे डॉ. गोमारे यांनी सांगितले. दुसरा डोस पूर्ण करण्यासाठी दररोज 50 हजारांवर जण दुसरा डोस देण्यात येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
एकूण दीड लाखांवर डोस दिले
मुंबईत 16 नोव्हेंबरच्या आकडेवारीनुसार पालिका, खासगी आणि सरकारी लसीकरण केंद्रांवर एकूण 1 कोटी 50 लाख 53 हजार 775 डोस देण्यात आले आहेत. यामध्ये पात्र लाभार्थ्यांचा पहिला डोस 100 टक्के पूर्ण झाला असून पात्र लाभार्थ्यांपैकी सुमारे 68 ते 70 टक्के जणांनी दुसरा डोस घेतला आहे.






















































