
मुंबईतील 500 चौरस फुटांपर्यंतच्या मालमत्तांना प्रॉपर्टी टॅक्समधून सूट देण्याचे वचन शिवसेना पाळणारच असे आज स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी आज स्पष्ट केले. प्रशासनाच्या भूमिकेबाबत लवकरच अभ्यास करून स्पष्टीकरण दिले जाईल, असेही जाधव यांनी स्पष्ट केले.
शिवसेनेच्या माध्यमातून घेतलेल्या महत्त्वाकांक्षी निर्णयामुळे मुंबईतील 500 चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता करातून सूट देण्यात आली आहे. यातच कोरोनाच्या प्रभावामुळे पाच वर्षांनी होणारी वाढही या वर्षी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. कोरोनाच्या फटका बसल्यामुळे या निर्णयाचा फायदाही लाखो मालमत्ताधारकांना होणार असल्याचे स्थायी समिती यशवंत जाधव यांनी सांगितले.
दरम्यान, पालिकेने 500 चौरस फुटांपर्यंतच्या थकीत करासाठी बिले पाठवण्याबाबत हालचाली सुरू केल्याचे वृत्त प्रसारमाध्यमात प्रसिद्ध झाले आहे. यामध्ये मालमत्ता करमाफीमुळे पालिकेला 285 कोटी रुपयांचा फटका बसला असून मालमत्ता करांतर्गत येणाऱया 10 पैकी फक्त सर्वसाधारण कर माफ केला जाणार असून 9 कर भरावे लागतील असे प्रशासनाकडून सांगण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या कार्यवाहीबाबत माहिती घेतली जाईल आणि मुंबईकरांच्या हिताचाच निर्णय घेतला जाईल. शिवसेना करमाफीचे वचन पाळणारच, असेही यशवंत जाधव यांनी स्पष्ट केले.