बिलांची रक्कम अदा करण्यासाठी मागितली लाच; पालिकेच्या शिक्षण विभागाचे परिवेक्षक भांडारपाल ट्रॅप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
bribe

शालेय पोषण आहार पुरवठा करणाऱयाकडे थकीत बिलांची रक्कम अदा करण्यासाठी लाच मागणारे पालिकेच्या शिक्षण विभागाचे परिवेक्षक भांडारपाल 24 हजार घेताना ऍण्टी करप्शन ब्युरोच्या सापळय़ात ट्रॅप झाले. डॉ. राजेंद्र राजपूत (47)असे त्यांचे नाव आहे.

मनसुख (नाव बदललेले) यांच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली. मनसुख हे पालिकेमध्ये शालेय पोषण आहार पुरवठा करण्याचे काम करतात 2010 ते मार्च 2020 पर्यंत मनसुख यांनी पालिकेच्या शाळांमध्ये शालेय पोषण आहार पुरवठा केलेला आहे. सदर बिलांची रक्कम मिळणे पालिकेकडे बाकी आहे. त्यासाठी मनसुख हे पालिकेच्या करी रोड येथील शिक्षण अधिकारी कार्यालयात चौकशीसाठी गेले असता डॉ. राजपूत यांनी सांगितले की, मागील बाकी बिलांपैकी दोन ते तीन लाख रुपये तुमच्या खात्यावर जमा करण्यात आले आहेत. त्याचे प्रथम 10 टक्केप्रमाणे पैसे द्या, त्यानंतरच उर्वरित बिले काढतो; परंतु मनसुख यांना लाच द्यायची नसल्याने त्यांनी ऍण्टी करप्शन ब्युरोकडे तक्रार केली. त्यानुसार ऍण्टी करप्शन ब्युरोच्या पथकाने तक्रारीची खातरजमा करून आज ट्रॅप लावला. या ट्रपमध्ये अदा बिलांच्या रकमेतील दहा टक्के प्रमाणे 24 हजार रुपये मनसुख यांच्याकडून घेताना डॉ. राजपूत ट्रॅप झाले.