
सामना प्रतिनिधी । मुंबई
राज्यभरात २३ जूनपासून प्लॅस्टिकबंदी लागू होत असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रभावी अंमलबजावणीसाठी पालिकेने वरळीत प्लॅस्टिकच्या पर्यायांची माहिती देणारे तीन दिवसीय प्रदर्शन आयोजित केले आहे. २२ ते २४ जूनदरम्यान ‘नॅशनल स्पोर्टस् क्लब ऑफ इंडिया’च्या स्टेडियममध्ये हे प्रदर्शन होणार आहे. आज ११.३० वाजता पर्यावरणमंत्री रामदास कदम, महापौर प्रिं. विश्वनाथ महाडेश्वर, शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, पालिका आयुक्त अजोय मेहता, अभिनेता अजय देवगण, काजोल, मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस आदी मान्यवरांच्या उपस्थितीत या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे.‘प्लॅस्टिकबंदी’बाबत जनजागृतीसाठी पालिकेच्या वतीने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन सकाळी १० ते सायंकाळी ७ या वेळेत सुरू राहील. प्रदर्शनात प्लॅस्टिकच्या पर्यायी वस्तूंचे-उत्पादकांचे ६१ ‘स्टॉल्स’ क महिला बचत गटांचे ५० स्टॉल्स’देखील या प्रदर्शनात असणार आहेत.
या प्रश्नांची उत्तरे मिळणार
– दैनंदिन वापरातल्या प्लॅस्टिकला पर्याय काय?
– नारळपाणी पिताना प्लॅस्टिक स्ट्रॉ वापरावा की नाही?
– प्लॅस्टिक पिशवीला पर्याय काय? रेनकोट चालेल का?
– विविध कस्तूंच्या पॅकेजिंगसाठी पर्याय कोणते?
– व्यावसायिकांनी कोणती खबरदारी घ्यावी?
राज्यभरातील रस्ते होणार प्लॅस्टिकचे!
राज्यभरात दोन दिवसांनी १०० टक्के प्लॅस्टिकबंदी लागू होणार आहे. या प्लॅस्टिकबंदीनंतर जे निरुपयोगी प्लॅस्टिक उपलब्ध होणार आहे ते प्लॅस्टिक आता राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येणाऱया राज्यमार्ग, प्रमुख जिल्हामार्गांच्या डांबरीकरणात वापरण्यात येणार आहे. याविषयीचा शासन निर्णय जारी करून डांबरीकरणाची कामे करताना निरुपयोगी प्लॅस्टिक वापरणे सरकारने बंधनकारक केले आहे.
राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंत्याला याच्या अंमलबजावणीकडे लक्ष द्यावे लागणार आहे. काम पूर्ण झाल्यानंतर दर तीन महिन्यांनी कामाच्या दर्जाची वेळोवेळी तपासणी करण्यात येणार आहे. एक वर्षाच्या कालावधीनंतर या कामांचा अहवाल सरकारला सादर करावा लागणार आहे.


























































