स्थानिकांना अर्ध्या किमतीत पार्किंग, वादावादी टळणार

49

सामना ऑनलाईन, मुंबई

पालिकेच्या वाहनतळांवर स्थानिक रहिवाशांना आता अर्ध्या किमतीत आपल्या गाडय़ा पार्क करता येणार आहेत. पालिकेच्या सध्या असलेल्या 27 वाहनतळांवर ही सुविधा उपलब्ध होईल. शिवसेनेच्या मागणीनंतर घेतलेल्या या महत्त्वपूर्ण निर्णयाच्या अंमलबजावणीचे आदेश पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी संबंधित विभागांना दिले. यामुळे 7 जुलैपासून पालिकेच्या बेकायदा पार्किंगविरोधातील कारवाईमुळे सुरू झालेले वादावादी-संघर्षाचे प्रसंग टळणार आहेत.

मुंबईतील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन पालिकेच्या वाहनतळापासून मीटरच्या आत बेकायदा पार्किंग करणाऱ्या वाहनचालकांकडून एक ते दहा हजार रुपये दंड वसूल करण्याचे निर्देश दिले आहेत. यानुसार 7 जुलैपासून सर्व विभागांत सुरू केलेल्या कारवाईत दररोज एक ते दोन लाखांचा दंड वसूल केला जात आहे. मात्र यामध्ये पालिकेचे वाहनतळ असलेल्या अनेक परिसरांत 500 मीटरच्या आत मोठय़ा संख्येने रहिवासी राहत आहेत. अशा स्थानिक रहिवाशांकडूनही गाडी पार्क केल्यास पालिकेकडून हजारो रुपयांचा दंड वसूल केला जात असल्यामुळे वादावादी आणि प्रशासन-स्थानिक यांच्यात संघर्षाचे प्रसंग घडत आहेत. काही ठिकाणी पालिकेच्या कारवाईविरोधात रास्तो रोको, आंदोलने करण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या निर्देशानुसार नगरसेवक, जी ‘दक्षिण’ प्रभाग समिती अध्यक्ष समाधान सरवणकर यांनी पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांना निवेदन देऊन स्थानिकांकडून सरसकट दंडवसुली न करता स्वतंत्र पार्किंग धोरण तयार करण्याची मागणी केली. यावेळी आरोग्य समिती अध्यक्ष अमेय घोले हेदेखील उपस्थित होते. सुविधा देणे हे पालिकेचे कर्तव्य असताना सध्याच्या पार्किंग धोरणाचा स्थानिकांना फटका बसत असल्यामुळे  त्यांच्यासाठी वेगळे धोरण तयार करावे अशी मागणी केल्याचे समाधान सरवणकर यांनी सांगितले.

असे आहेत सध्याचे दर

पालिकेच्या वाहनतळांवर सध्या तीन ते चार चाकी वाहनांना एक तास ते 24 तासांसाठी 25 रुपयांपासून 80 रुपयांपर्यंत, दोन चाकी वाहनांना 10 ते 35 रुपये, ट्रक – 35 ते 205 रुपये, रिक्षा-टॅक्सी – 25 ते 80 रुपये आणि बससाठी 25 ते 145 रुपये वाहनतळ शुल्क घेतले जाते. मुंबईतील वाहनतळांच्या शुल्कानुसार वाहनतळ शुल्काचे दर काही प्रमाणात कमी-जास्त आहेत.

आम्ही पिढीजात रहिवासी, दंड का भरायचा!

पालिकेच्या 27 वाहनतळांपासून 500 मीटरच्या आत बेकायदा पार्किंग करणाऱ्या वाहनचालकांविरोधात पालिकेची धडक कारवाई सुरू आहे. मात्र दादर, लोअर परळ अशा अनेक विभागांत पालिकेच्या वाहनतळांपासून जवळ राहणाऱ्या वाहनचालकांना पालिकेच्या कारवाईचा फटका बसत आहे. त्यामुळे ‘आम्ही इथले पिढीजात रहिवासी आहोत, मग दंड का भरायचा’ असा सवाल संतप्त रहिवासी करीत आहेत.

पालिकेच्या वाहनतळांवर आगामी काळात स्थानिक रहिवाशांना सध्याच्या निर्धारित दरांपेक्षा अर्ध्या किमतीत पार्किंग सुविधा उपलब्ध होईल. तसे आदेश संबंधित विभागांना देण्यात आले आहेत. याबाबतची आवश्यक कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर हा नियम लागू होईल. प्रवीण परदेशी, पालिका आयुक्त

आपली प्रतिक्रिया द्या