‘खड्डा दाखवा, 500 रुपये कमवा’ पुन्हा सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘खड्डेमुक्त मुंबई’साठी पालिकेने 1 नोव्हेंबरपासून एका आठवाड्यासाठी सुरू केलेली ‘खड्डा दाखवा आणि 500 रुपये कमवा’ योजना पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या उपक्रमाला उत्तम प्रतिसाद मिळाल्यामुळे मुंबई खड्डेमुक्त करण्यासाठी हा उपक्रम पुन्हा सुरू करणार असल्याचे पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी सांगितले.

पालिकेने मुंबईत 1 नोव्हेंबरपासून ‘रस्त्यावर खड्डा दाखवा, 500 रुपये मिळवा’ असा अभिनव उपक्रम राबवला. यामध्ये पालिकेच्या ऍपवर तक्रार नोंदवल्यानंतर 24 तासांत खड्डा बुजवला गेला नाही तर तक्रारदाराला 500 रुपये देणार असल्याचे प्रशासनाने जाहीर केले होते. विशेष म्हणजे कंत्राटदार-अधिकाऱयांकडून रस्त्यांची कामे दर्जेदार व्हावीत, टिकावू-मजबूत रस्ते बनावेत यासाठी खड्डा बुजवला नाही तर खड्डय़ाच्या तक्रारदारांना देण्यात येणारे 500 रुपये संबंधित वॉर्ड अधिकारी आणि कंत्राटदाराच्या खिशातून देण्यात येणार आहेत. दरम्यान, ही योजना पुन्हा सुरू झाल्यामुळे मुंबईकरांना ‘माय बीएमसी पॉट होल फिक्स इट’वर खड्डय़ाचा फोटो टाकता येणार आहे. तक्रार केल्यानंतर 24 तासांच्या आत खड्डा बुजवला गेला नाही तर तक्रारदारांना 500 रुपये दिले जातील.

पैसे नको, खड्डे बुजवा!

पालिकेने 1 नोव्हेंबरपासून सुरू केलेल्या उपक्रमात सात दिवसांत एकूण 1700 तक्रारी दाखल झाल्या. यातील 147 खड्डे पालिकेला तक्रारीनंतर 24 तासांत बुजवता आले नाहीत. यामधील 72 तक्रारदारांना प्रत्येकी 500 रुपये संबंधित वॉर्डच्या निधीतून देण्यात आले. हे पैसे अधिकारी-कंत्राटदाराच्या खिशातून वसूल करण्यात येणार आहेत. दरम्यान, खड्डय़ांची तक्रार केलेल्या तब्बल 36 जणांनी 500 रुपये नाकारले. आम्ही पैसे कमवण्यासाठी तक्रार केली नसल्याचे सांगत ‘पैसे नको, फक्त खड्डे बुजवा’ असे मत नोंदवल्याचे पालिका अधिकाऱयाने सांगितले, तर 39 तक्रारदारांनी पालिकेला कोणताही प्रतिसाद दिला नाही.