
सामना प्रतिनिधी । मुंबई
मोठय़ा सोसायट्यांमध्ये कचऱ्याच्या विल्हेवाटीचा प्रयोग काहीसा थंडावल्यानंतर पालिका प्रशासन आता 24 विभागांत ‘स्वच्छता मित्र’ नेमणार आहे. घनकचरा व्यवस्थापनसंबंधी कामे प्रभावीपणे राबवण्याची जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आली आहे. नागरिकांना कचऱ्याचे वर्गीकरण करण्यास भाग पाडणे, विभागातील शौचालयांच्या स्वच्छतेची पाहणी करणे ही कामे त्यांना देण्यात येणार आहेत.
20 हजार चौरस मीटरपेक्षा अधिक आकाराच्या भूखंडावरील गृहसंकुल, तसेच दररोज 100 किलोंपेक्षा अधिक कचरा निर्माण होतो अशा सोसायट्या वा उपाहारगृहे इत्यादींनी त्यांच्या स्तरावर कचऱ्याचे वर्गीकरण करणे, तसेच ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून त्यापासून खतनिर्मिती करणे पालिकेने बंधनकारक केले आहे. याकरिता प्रशासनाने खास ‘स्वच्छता मित्र’ नेमण्याचे ठरवले आहे. पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
ही असतील कामे
आपल्या विभागातील ‘बल्क जनरेटर्स’च्या ठिकाणांना भेटी देणे, संबंधित सोसायट्यांच्या पदाधिकाऱ्यांशी किंवा संबंधित व्यवस्थापनाशी संपर्क साधणे, आपल्या परिसरातील शौचालयांना भेटी देऊन तेथील स्वच्छताविषयक पाहणी करणे व निर्धारित प्रारूपामध्ये वेळोवेळी आवश्यक ते अहवाल सादर करणे, संबंधितांच्या समस्या समजावून घेऊन त्यांचे निराकरण करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करणे, संबंधितांशी नियमित संपर्क व संवाद ठेवण्यासाठी ‘व्हॉटस्ऍप’ सारख्या समाजमाध्यमांचा वापर करणे अशी कामे स्वच्छता मित्रांकडे सोपविण्यात येणार आहेत.
- मोठय़ा प्रमाणात कचरा निर्माण होणाऱ्या सोसायट्या व आस्थापने (बल्क जनरेटर्स) – 3 हजार 374
- कचरा वर्गीकरण व प्रक्रिया सुरू – 1 हजार 476
- न्यायालयीन खटले दाखल – 862 प्रकरणी
- आतापर्यंत दंड वसूल – 27 लाख रुपये
यांना देणार जबाबदारी
प्रत्येक विभागातील ‘सहाय्यक प्रमुख पर्यवेक्षक’ व ‘कनिष्ठ आवेक्षक’ यांच्याकडे त्या त्या विभागातील ‘स्वच्छता मित्र’ विषयक जबाबदारी सोपविण्यात येणार आहे.
































































